मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपाची युती तुटली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या काही शिवसेनेवर आसूड ओढायच्या थांबत नाहीएत. आज त्यांनी जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही, पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे तर नीट काम करावं, असा टोला हाणला आहे.
'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झाले. या कार्यक्रमात अमृता यांनी लोकमतशी बोलताना राज्य सरकारवर ही टिप्पणी केली.
राज्य सरकारने शहाणे व्हावे, जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही, पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे तर नीट काम करावे. कुणी काही बोलतेय त्यावर रिएक्ट करून त्रास देणे बंद करावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच जलयुक्त शिवारसारख्या योजनेतही देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठा माणूस मोठाच राहतो, असेही त्यांनी सुनावले आहे.
दरम्यान, पुस्तक प्रकाशन सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरातांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरणार, असल्याचे म्हटले. तर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, असे सांगितले.
'माझी भिंत' मध्ये अनेक गुजगोष्टी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेल्या राजेंद्र दर्डा यांनी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. वर्तमान कितीही गुंतागंतीचं आणि जिकिरीचं असलं, तरी येणारा दिवस आपलाच आहे, असा दिलासा देणाऱ्या अनेक गुजगोष्टी 'माझी भिंत' या पुस्तकात सामावलेल्या आहेत. वेगाने विषारी होत चाललेल्या समाजमाध्यमांचा कट्टा शुभंकर विचारांच्या प्रसारासाठी किती सकारात्मकतेने वापरता येतो, याची प्रचिती या अनोख्या पुस्तकात मिळते. फेसबुकच्या भिंतीवर केवळ द्वेष आणि भांडणं नव्हे तर प्रेम आणि स्नेहही फुलवता येतो, याचा अनुभव देणारं हे संकलन; हा मराठीतल्या या स्वरुपाचा पहिलाच प्रयोग आहे. राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या अनुभवातून एक वेगळे विश्व यानिमित्ताने पुस्तकरुपाने समोर आणले आहे.