पुणे : राज्य सरकारने पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केलेली निवड योग्यच आहे. राजकारणामध्ये किती वर्षे आहेत. हे पाहण्यापेक्षा त्यांच्यामध्ये किती गुणवत्ता आहे, हे पाहायला हवे, असे सांगत विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांनी निवड करण्यात आली. या निवडीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या टिकेवर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांना ठाकरे नावाचीच अॅलर्जी असल्याने ते टीका करत आहेत. टीका करण्यासाठी विरोधकांकडे भरपूर वेळ आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आघाडी सरकारवर टीका करण्याचा त्यांचा उपक्रम आहे. मात्र, त्यांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही. आदित्य ठाकरे हे अध्यक्ष असलेल्या समितीत माझा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे क्षमता असून ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, असे सामंत यांनी सांगितले.
याचबरोबर, एखाद्या प्रकरणात त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर त्याला जनता प्रत्युत्तर देईल. ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. काही लोकांकडून स्वतःच अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे. यामुळे सरकारविरोधात टीका करण्याचे काम सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले.
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यात लवकर तज्ज्ञांती कृती समिती स्थापन केली जाणार आहे. धोरणातील विविध तरतुदींची अंमलबजावणी व बदल करण्याबाबत पुढील एक-दोन महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मिती निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ करण्यास तेथील अनेकांचा नकार आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपकेंद्र चांगल्याप्रकारे विकसित केली जातील. त्याअनुषंगाने शैक्षणिक धोरणाचाही आधार घेतला जाईल. तज्ज्ञ समिती त्यावर अभ्यास करेल, असेही उदय सामंत यांनी नमूद केले.