पिंपरी : विधानसभेचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जगतापनगर, थेरगाव येथे मंगळवारी (दि. २) हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ४) गुन्हा दाखल झाला.
युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करून आरोपीने त्याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केला. त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी आरोपी दाखले याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला आजच अटक करू
देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावरून भाजपचे आमदार संतप्त झाले. त्यानंतर, नाना पटोलेंनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी या आक्षेपार्ह पोस्टवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं, त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्या कार्यकर्त्याला आजच अटक केली जाईल असं आश्वासन दिलं होतं.