पेट्रोल नक्कीच 100 रुपये गाठेल, लसीकरणाचा खर्च केंद्रानेच करावा; अजित पवारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 05:14 PM2021-02-07T17:14:30+5:302021-02-07T17:15:56+5:30
Ajit pawar News : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ही बाजारात हवा तसा उठाव आला नाही. मात्र, स्टील, सिमेंट, डांबरची किंमत प्रचंड वाढलेली आहे. या सर्व वस्तुंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढलेली आहे. याचसोबत डिझेल, पेट्रोल, घरघुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा बराच काळ कोरोना महामारीत गेला. त्यामुळे विकास दर घटला आहे. अनेक कामांना कात्री लावावी लागली. अधिवेशनाचा कालावधी देखील कमी करावा लागला. आता कोरोना हळू हळू कमी होतोय. पुण्यात काल एक ही मृत्यू नाही. अद्यापही केंद्राकडून राज्याच्या जीएसटीचे 35 हजार कोटी रुपये आलेले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माझ्या आधी मुख्यमंत्री येऊन गेले. प्राणी संग्रहालयाच्या कार्यक्रमात आले होते. गेल्या वर्षी पाऊस चांगला असल्याने धरणाची स्थिती समाधानकारक आहे. जीएसटीवर आता केंद्राची स्थिती सुधारत आहे. दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते ते येत नाहीयेत. कोरोना काळात आर्थिक स्थिती कमकुवत झाली असताना काही महत्वाच्या विभागांना आम्ही निधी कमी केला नाही. जिल्हा विकास निधीला कात्री लावली नाही, असेही पवार म्हणाले. (Ajit Pawar Speak on corona pandemic, inflation)
रियल इस्टेट क्षेत्रात आम्ही मुद्रांक शुल्क कमी केले. त्याला डिसेंबरपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. जानेवारीपासून तेवढी खरेदी नाही. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ही बाजारात हवा तसा उठाव आला नाही. मात्र, स्टील, सिमेंट, डांबरची किंमत प्रचंड वाढलेली आहे. या सर्व वस्तुंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढलेली आहे. याचसोबत डिझेल, पेट्रोल, घरघुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. काही काळात पेट्रोल नक्कीच 100 रुपये गाठेल, अशी भविष्यवाणीदेखील अजित पवारांनी केली. तसेच कोरोना लसीकरणाचा खर्च राज्यांवर न ढकलता तो केंद्र सरकारनेच करावा अशी मागणीही केली.