ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; हल्ल्याप्रकरणी TMC निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:54 AM2021-03-11T09:54:58+5:302021-03-11T09:55:35+5:30
tmc leaders will meet election commission over attack on mamata banerjee : ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याबाबत तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेस शांत बसणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) दिली जाईल, असे पक्षाचे नेते पार्थ चटर्जी (Path Chatarjee) यांनी म्हटले आहे. (parth chatarjee says tmc leaders will meet election commission over attack on mamata banerjee)
ममता बॅनर्जी यांना रोखण्यासाठी काही पळपुट्या लोकांनी अशी कृती केली. परंतु या कृतीत कोणीही यशस्वी होऊ शकणार नाही. ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्या हे एक षडयंत्र आहे, असेही पार्थ चटर्जी यांनी म्हटले. दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या एका पायाला प्लॅस्टर करण्यात आल्याची छायाचित्रे समोर आली आहेत.
ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने तयार रहावे. रविवारी 2 मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा, असे त्यांनी म्हटले आहे. तर, ममता बॅनर्जी यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आल्याचे एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला कसा झाला?
या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही, तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी, ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालची निवडणूक हायव्होल्टेज ठरणार
दरम्यान, देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतू सर्वात हायव्होल्टेज निवडणूक ही पश्चिम बंगालची ठरणार आहे. याठिकाणी भाजपाला काहीही करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवायची आहे, तर तृणमूल काँग्रेसला काहीही करून सत्ता टिकवायची आहे. यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.