नवी दिल्ली/मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून या भेटीबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मोदी-पवार यांच्या भेटीआधी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंहदेखील पवार यांना भेटल्याचं राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.आधी दोन बडे मंत्री पवारांना भेटले अन् मग पवारच मोदींच्या भेटीला गेले; वाचा नेमके काय घडले
पंतप्रधान मोदींकडे शरद पवारांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. मोदींनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर आज दोन्ही नेते भेटले, असं मलिक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना या भेटीची कल्पना होती. काही दिवसांपूर्वीच शरद पवार मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेटले होते. याशिवाय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनादेखील पवार आणि मोदींच्या भेटीची कल्पना होती, अशी महत्त्वाची माहिती मलिक यांनी दिली.पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण
मोदी आणि पवार यांच्यामध्ये बँकिंग क्षेत्राबद्दल महत्त्वाची चर्चा झाली. बँक रजिस्ट्री कायद्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सहकारी बँकेच्या अधिकारांवर गदा आली आहे. बँकांचे अधिकार मर्यादित झाले आहेत. कायद्यात सुधारणा केल्यानंतर काही विसंगती आहेत. त्या गोष्टी शरद पवारांनी मोदींना सांगितल्या आणि लक्ष घालण्याचं आवाहन केलं. ही भेट अचानक झालेली नाही. भेट ठरलेली होती. या भेटीबद्दल संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे, असं मलिक म्हणाले.
मोदींची भेट घेण्याआधी दोन केंद्रीय मंत्री शरद पवारांना भेटले. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून निवड झाली आहे. त्यातच आथा पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांनी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. तर शरद पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट सिंह यांच्या दालनात झाली. त्यांनी यावेळी पवारांनी चिनी सैन्याकडून सुरू असलेल्या कारवायांची माहिती दिली. शरद पवार यांनी संरक्षण मंत्रिपद भूषवलं असल्यानं सिंह यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणेदेखील उपस्थित होते, अशी माहिती मलिक यांनी दिली.