नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करण्यात येत आहे. पुढच्या काही वेळात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नव्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. तर दीर्घकाळापासून मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना नारळ देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजून दोन बड्या मंत्र्यांचेही राजीनामे घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही एका बड्या नेत्याचा समावेश आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारमधील कायदे आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला काही वेळ उरला असताना मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडे यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. तत्पूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आरोग्यमंत्री हर्षवर्धन, रोजगारमंत्री संतोष गंगवार आणि सदानंद गौडा यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत असून, यामध्ये एकूण ४३ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे. यामध्ये नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश आहे.
दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळातील तब्बल १२ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. यामध्ये डी. व्ही. सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, रमोश पोखरियाल निशंक, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संतोष गंगवार, बाबुल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगी, देबश्री चौधरी यांचा समावेश आहे.