नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला जम्मू-काश्मीरमधील १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्वपक्षीय बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा वेगळाच नूर आणि सूर पाहायला मिळाल्याचे सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या फोरमशी चर्चा करताना मुफ्ती यांनी पाकिस्तानशीही चर्चा करण्याची वकिली केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीतील या बैठकीत मुफ्ती यांनी पाकिस्तानबाबत अवाक्षर काढले नसल्याची माहिती मिळाली आहे. (pm modi meeting mehbooba mufti changed her tune on talk to pakistan and article 370)
अनुच्छेद ३७० हटवल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कोणीही तिरंगा हातात घेणार नाही, असा दावा करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती त्याच तिरंगा ध्वजाच्या समोर बसून पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. एका वृत्तपत्रानुसार, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत फुटीरतावादी आणि पाकिस्तानशी चर्चेबाबत मेहबुबा मुफ्ती यांनी अवाक्षरही काढले नाही. मात्र, या बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये माध्यमांशी बोलताना, जम्मू-काश्मीरच्या नेत्यांची चर्चा करत असताना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा आग्रह मेहबुबा मुफ्ती यांनी धरला होता.
जम्मू-काश्मीरसंदर्भात केंद्राने पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे: मेहबुबा मुफ्ती
काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानही पक्षकार
आम्हाला भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आमच्याकडून काढून घेतलेले आहेत. जम्मू-काश्मीरचाही मुद्दा आहेच. या पूर्ण क्षेत्रात शांतता कायम प्रस्थापित करायला हवी. ही मंडळी तालिबान्यांशी चर्चा करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील सर्वांसोबत चर्चा करावी. तसेच पाकिस्तानशीही बोलणी करावी. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानही पक्षकार आहे, असे मेहबुबा मुफ्ती यांनी यापूर्वी म्हटले होते.
दरम्यान, राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे. एवढेच नाही, तर, दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं, असे पंतप्रधान मोदी या बैठकीनंतर म्हणाले. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सुमारे ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी संवाद साधला.