रायपूरः छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा आणि त्यांच्या गाडीचालकाचा मृत्यू झाला. तर तीन जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केलं आहे. मोदी म्हणाले, या नक्षलवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. जे जवान शहीद झाले, त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.छत्तीसगडमधला दंतेवाडा हा नक्षल प्रभावित भाग आहे. या भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी घातपात करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यादृष्टीनं कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तरीही हा हल्ला घडवून आणला गेला. मांडवी हे सभा आटोपून घरी येत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला.
नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 7:47 PM