पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह राणे (Pratapsingh Rane) यांनी आमदार म्हणून गोव्याच्या विधिमंडळात ५० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही प्रतापसिंह राणे यांना आज शुभेच्छा दिल्या. तसेच गोव्याच्या प्रगतीसाठीचा त्यांचा उत्साह त्यांच्या कार्यामधून दिसून येतो, अशा शब्दात प्रतापसिंह राणेंचा गौरव केला. गोव्याच्या विधानसभेनेही प्रतापसिंह राणेंना शुभेच्छा दिल्या. त्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडून एक प्रस्ताव मांडण्यात आला. (PM Narendra Modi congratulates Goa congress leader Pratapsingh Rane for completing 50 years as MLA)
प्रतापसिंह राणे यांना शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात की, प्रतापसिंह राणेजी आमदार म्हणून ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जनतेची सेवा आणि गोव्याच्या प्रगतीसाठी प्रतापसिंह राणे यांचा उत्साह त्यांच्या कार्यामधून दिसून येतो. मला त्यांच्यासोबत मुख्यमंत्री असताना केलेल्या चर्चा अजूनही आठवणीत आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ट्विट करून प्रतापसिंह राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत. सावंत यांनी ट्विट करताना लिहिले की, आमदाराच्या रूपात ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक कार्य आणि राजकारणामध्ये त्यांचा दीर्घ अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची भावी वाटचाल आणि आरोग्यासाठी शुभेच्छा, असे प्रमोद सावंत म्हणाले.