नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला, त्याचसोबत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केले आहे, आंदोलन करणं योग्य नाही, शेतकऱ्यांनी पुढे येऊन चर्चा करावी, कृषिमंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेतच, पण वयोवृद्ध लोकांना घेऊन आंदोलनात बसणं योग्य नाही. देशाला पुढे घेऊन जायचं आहे, सगळ्यांनी सोबत यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना केलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, काळानुसार बदलणं ही काळाची गरज आहे, जे लोक राजकीय प्रतिक्रिया देत आहेत त्यांनीही सुधारणांवर अनेकदा भाष्य केले आहे, परंतु कोणीही पुढाकार घेतला नव्हता, कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत, चर्चा करावी, जे काही चांगलं होईल त्याचं श्रेय तुम्ही घ्या चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा करावी असं मोदींनी विरोधकांना सांगितले.
तसेच एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवं, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया.. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत MSP आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचं आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये असं नरेंद्र मोदींनी सांगितले.
कृषी विधेयकावरून विरोधकांचा यू टर्न; शरद पवारांचं नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डागली तोफ
आंदोलनजीवी ही नवी जमात देशात उदयास आली
वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात, असे मोदींनी म्हटले. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही.
मोदी है मौका लिजिए
संसदेत चर्चेच्या माध्यमातून अनेकांनी भाष्य केले, त्यांचा राग व्यक्त केला, माझ्यावरही टीका झाली, केवढं बोललं गेलं, मी तुमच्या कामी आलो याचा मला आनंद आहे. माझ्यावर राग काढल्यानं तुमचा केवढा राग हलका झाला असेलअसा आनंद घेत राहा, चर्चा करत राहा, मोदी आहे संधी घ्या टीका करत राहा, आनंद घ्या...याठिकाणी मनातील राग बाहेर काढल्यानंतर घरी निवांत शांततेत राहता येत असेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.
शीख बांधवांचा देशाला अभिमान
फाळणी झाली सर्वात जास्त फटका पंजाबला बसला, जेव्हा दंगली झाल्या पंजाबला भोगावे लागले. जम्मू काश्मीर आणि तेथील घटनांमुळेही पंजाबला त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे शीख बांधवांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरल्या जात आहेत. गुरुंची महान परंपरा शीख धर्मीयांना आहे. देशाला शीख बांधवांचा अभिमान आहे असं पंतप्रधानांनी सांगितले.
जगातील प्रत्येक देशासमोर आव्हानं
जगातील कोणत्याच देशात आव्हानं नाहीत असं होत नाही, प्रत्येक देशात आव्हान असतात, पण आपण समस्येचा भाग बनावं की समाधानाचा हे स्वत: ठरवावं लागतं, वर्तमानासाठी आणि भविष्यासाठीही काम करायचं आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.