नवी दिल्ली – सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर संबोधित केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेला संबोधित केले, काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले, त्याचसोबत आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचं दिसून आलं.
एका दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले, आझाद यांचं कौतुक करताना ते म्हणाले की, त्यांच्या घराच्या परिसरातील बगीचा पाहून काश्मीरची आठवण होते, गुजरातच्या पर्यटकांवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा सर्वात आधी गुलाम नबी आझाद यांचा फोन मला आला, तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची जशी चिंता असले तशी चिंता गुजरातच्या लोकांबद्दल आझाद यांना होती, असं मोदी म्हणाले.(PM Narendra Modi gets emotional while reminiscing an incident involving Congress leader Ghulam Nabi Azad)
या हल्ल्यात ८ लोक मारले गेले होते, तेव्हा प्रणब मुखर्जी संरक्षण मंत्री होते, मी त्यांना या पर्यटकांचे मृतदेह गुजरातमध्ये आणण्यासाठी संरक्षण खात्याच्या एअरप्लेनची मागणी केली, प्रणब मुखर्जी यांनी सांगितले चिंता करू नका, रात्री खूप उशीर झाला होता, पुन्हा गुलाम नबी आझाद यांचा मला फोन आला. ते एअरपोर्टवर होते, आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांची त्या सदस्यांची काळजी घेतली...अशी चिंता....म्हणत ते वाक्य नरेंद्र मोदी पूर्ण करू शकले नाहीत, त्यांना गहिवरून आले.
त्याचसोबत मला चिंता आहे की, गुलाम नबी आझाद यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, गुलाम नबी आझादांनी नेहमीच पक्षाची चिंता केली, पण यापुढे देश आणि सभागृह गुलाब नबी आझादांची चिंता करेल. देशासाठी आझाद यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी सॅल्यूट करतो, सत्ता जीवनात येते आणि जाते, मात्र तिची ओळख ठेवावी हे गुलाम नबी आझादांकडून शिकायला हवे. मित्राच्या नात्याने मी आझाद यांचा खूप आदर करतो असंही मोदी म्हणाले.
दरम्यान, ज्यावेळी मी निवडणुकांच्या राजकारणात नव्हतो, गुलाम नबी आझाद आणि मी लॉबीमध्ये चर्चा करत होतो, तेव्हा पत्रकारांनी आम्हाला पाहिले, गुलाब नबी आझादांना पत्रकारांनी प्रश्न विचारलं असता, त्यांनी उत्तर दिलं की, तुम्ही भलेही नेत्यांना टीव्हीवर लढताना पाहिले असेल पण याठिकाणी कुटुबांसारखं वातावरण असतं, जे सदस्य आज सभागृहातून निवृत्त होत आहेत, त्यांच्यासाठी कायम दार खुलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले, राज्यसभेतून गुलाम नबी आझादांसोबत मीर मोहम्मद, शमशेर सिंह आणि नाजिर अहमद हे ४ सदस्य निवृत्त होत आहेत.