कोयंबटूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एका महिलेचा फोटो शेअर केला आहे, या फोटोत मोदी त्या महिलेसमोर झुकून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसून येतात. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) कोयंबटूरला आले होते, याठिकाणी मोदींनी १०६ वर्षाच्या अम्मासोबत फोटो काढला, या फोटोची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ही अम्मा आहे कोण आपण जाणून घेऊया...
देशातील सर्वात वृद्ध शेतकरी पप्पामल!
१०६ वर्षाची आर. पप्पामल(Amma Pappammal) या तामिळनाडूत जैविक शेती करण्यासाठी चर्चेत आहेत, त्या देशातील सर्वात वृद्ध शेतकरी असल्याचं सांगितलं जातं, ज्या आताही शेतातल्या कामात सक्रीय आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत पेजवर हा फोटो शेअर केला आहे, या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर पप्पामल हात ठेऊन आशीर्वाद देताना दिसतात. पंतप्रधानांनी हा फोटो शेअर करताना म्हटलंय की, आज कोयंबटूर येथे आर. पप्पामल यांची भेट घेतली, कृषी आणि जैविक शेतीबद्ल त्यांचा असलेला अभ्यास आणि योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे.
बचतीच्या पैशातून घेतली १० एकर जमीन
कोयंबटूरमधील नीलगिरी हिल्स प्रसिद्ध ठिकाण आहे, १९१४ मध्ये कोयंबटूरच्या देवलापुरममध्ये पप्पामल यांचा जन्म झाला, अगदी लहान वयात पप्पामल यांच्यावरील आईवडिलांचे छत्र हरपलं, दोन बहिणींसोबत थेकमपट्टी येथे त्या आजीसोबत राहत होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी असलेल्या दुकानाची जबाबदारी पप्पामल यांनी सांभाळली, त्याचसोबत हॉटेल उघडलं, यातून झालेल्या कमाईतून वयाच्या ३० वर्षी त्यांनी गावात १० एकर जमीन खरेदी केली, इतकचं नाही तर बहिणींच्या मुलांचा सांभळही पप्पामल यांनी केला.
७ दशकापासून शेती, पहाटे ६ वाजता होते कामाला सुरुवात
१० एकर जमिनीत पप्पामल यांनी शेती करण्यास सुरुवात केली, शेतीच्या कामात त्यांचे मन रमले, मागील ७ दशकापासून त्यांच्या जैविक शेतीसाठी पप्पामल तामिळनाडूत नव्हे तर संपूर्ण भारतात प्रेरणादायी बनल्या आहेत. पहाटे साडेपाच वाजल्यापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते, ६ वाजता त्या शेतात पोहचतात. नियमित दिनक्रियेमुळे वयाच्या १०६ व्या वर्षीही त्या स्वत:ला निरोगी ठेऊ शकल्या. शेतातल्या भाज्या हाच त्यांचा आहार आहे, जेवणही त्या ताटात घेण्याऐवजी एका पानावर घेत असतात. मटण बिर्याणी हा त्यांच्या आवडीचा पदार्थ असल्याचं पप्पामल सांगतात.
शेतीसोबत राजकारणातही उतरल्या
शेतीसोबत पप्पामल यांनी राजकारणातही आपलं वर्चस्व निर्माण केले, १९५९ मध्ये थेकमपट्टी पंचायत प्रभागात वार्ड सदस्य म्हणून त्यांनी काम केले, त्याचसोबत करमादई पंचायत युनियनमध्येही त्या निवडून आल्या. एम. करूणानिधी यांच्या चाहत्या असलेल्या पप्पामल या डीएमके पक्षासोबत जोडल्या आहेत.