येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आता भाजपनंही पूर्णपणे जोर लावण्यास सुरूवात केली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात भारत माता की जय या घोषणेनं केली. "बंगालच्या पवित्र भूमीला मी नमन करतो. बंगालच्या या भूमीनं आमच्या संस्कारांना ऊर्जा दिली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यानही बंगालनं प्राण फुंकले होते. परंतु आता ममता बॅनर्जी यांनी बंगालला धोका दिला आहे," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल करत लोकसभेत तृणमूल काँग्रेस अर्धी झाली, यावेळी ती पूर्णच साफ होणार असल्याचं म्हटलं."पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन आणण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांनी ममता बॅनर्जींवर भरवसा केला होता. परंतु त्यांनी हा भरवसा तोडला आहे. या लोकांनी बंगालचा अपमान केला आहे. या ठिकाणच्या मता-भगिनींवर अत्याचार केला आहे. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे टीएमसी आहे, लेफ्ट-काँग्रेस आणि आहे आणि त्यांची बंगाल विरोधी वृत्ती आहे. तर दुसरीकडे स्वत: बंगालची जनता कंबर कसून उभी आहे. आज तुम्हा लोकांकडे पाहून कोणाच्याही मनात कोणतीही शंका येणार नाही. काही लोकांना तर आज २ मे आहे असंच वाटत असेल," असं मोदी म्हणाले.
विकासासाठी २४ तास मेहनत करू"मी या ठिकाणी परिवर्तानाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालच्या विकासाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालमध्ये बदल घडवण्याचा, गुंतवणूक वाढवण्याचा, पुनर्निर्माणाचा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी तरूण, शेतकरी, उद्योजक, माता-भगिनी यांच्या विकासासाठी आम्ही २४ तास दिवसरात्र मेहनतीनं काम करु. आम्ही मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही." असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.... तर शत्रू बनवलं असतंआपल्या संबोधनादरम्यान मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. "तुम्ही केवळ बंगालच्याच नाही तर भारताच्याही सुपुत्री आहात. काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही स्कूटी सांभाळली, तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाव्या अशी सर्वजण प्रार्थना करत होते. चांगलं झालं तुम्ही पडल्या नाहीत. नाहीतर ज्या राज्यात ती स्कूटी तयार झाली होती त्याच राज्याला आपला शत्रू बनवलं असतं," असं मोदी म्हणाले.राहुल गांधींवरही निशाणायावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. आजकाल आमचे विरोधक म्हणताता की मी मित्रांसाठी काम करतो. आपण सर्वच जाणतो की ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो, ज्या ठिकाणी खेळलो, ज्यांसोबत शिकलो ते आपल्या आयुष्यभराचे मित्र होतात. मी गरीबांमध्ये लहानाचा मोठा झालो आणि त्यामुळेच त्यांचं दु:ख काय आहे हे समजतो. यासाठीच मी मित्रांसाठी काम करतो आणि त्यांच्यासाठी काम करतच राहणार असल्याचंही त्यांनी सष्ट केलं.