नवी दिल्ली - गेल्या काही काळात कोरोना काळातील व्यवस्थापन तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. तसेच मोदींच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जो बायडन यांच्यासह जगातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कंसल्टकडून करण्यात आलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. (PM Narendra Modi tops list of world's most popular leader)
या सर्वेमध्ये ब्रिटन, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यासह १३ देशांच्या नेत्यांवर पंतप्रधान मोदींनी मात करून मोठी आघाडी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्लोबल अॅप्रुव्हल रेटिंग ६६ टक्के आहे. भारतामध्ये २ हजार १२६ प्रौढ व्यक्तींच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणासह मॉर्गिंग कंसल्ट ग्लोबल ली़डल अॅप्रुव्हल रेटिंग ट्रॅकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६६ टक्के अॅप्रुव्हल दाखवले आहे.
मॉर्निंग कंसल्ट नियमितपणे जगातील नेत्यांच्या रेटिंगला ट्रॅक करते. पंतप्रधान मोदींनंतर दुसरे स्थान इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी (६५ टक्के) यांनी मिळवले आहे. त्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्रपती एंड्रेस मेनुअल लोपेझ ओब्राडोर (६३ टक्के), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (५४), जर्मन चांसलर अंजेला मार्केल (५३ टक्के), अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (५३ टक्के), कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो (४८ टक्के) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (४४ टक्के) यांनी स्थान मिळवले आहे.