नवी दिल्ली- भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी ब्लॉग लिहून सध्याच्या भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. लालकृष्ण अडवाणींनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये राजकीय विरोधकांना शत्रू समजत नसल्याचं म्हटलं आहे. भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे, तर विरोधक मानतो, असं त्यांनी लिहिलं होतं, त्यावर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी ट्विट करत म्हटलं की, अडवाणींनी भाजपाची मूळ भूमिका व्यक्त केली. अडवाणींनी भाजपाचा खरा सारांश सांगितला आहे. खरं तर अडवाणींनी देश पहिला, त्यानंतर पक्ष अन् शेवटी स्वतः , या मंत्राचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा मला गर्व आहे आणि लालकृष्ण अडवाणींसारख्या महान नेत्यानं भाजपा हा पक्ष मजबूत केला, याचाही मला अभिमान आहे. तत्पूर्वी अडवाणींनी भाजपा स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर ब्लॉग लिहिला असून, 6 एप्रिलला भाजपाचा 39वा स्थापना आहे. अडवाणी लिहितात, 'देश प्रथम, पक्ष नंतर आणि अखेर स्वत:,' या शीर्षकानं अडवाणींनी ब्लॉग लिहिला. राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'आमच्या मतांपासून फारकत घेणाऱ्या, आमचे विचार पटत नसलेल्यांना आम्ही कधीच शत्रू मानलं नाही. आम्ही त्यांना केवळ विरोधकच समजलं,' असं अडवाणींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. कित्येक महिने जाहीर सभांमधून भाषणं न करणाऱ्या, संसदेतही मौन बाळगणाऱ्या अडवाणींनी ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अडवाणींनी खेचले कान, मोदींनी केला शाब्दिक सन्मान!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 10:30 PM