पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 01:15 PM2021-06-08T13:15:45+5:302021-06-08T13:39:52+5:30
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये दीड तास चर्चा; अजित पवार, अशोक चव्हाणदेखील उपस्थित
नवी दिल्ली: मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती.
मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 'पंतप्रधानांसोबतची भेट औपचारिक स्वरुपाची होती. त्यात मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक चर्चा झाली. मोदींनी संपूर्ण विषय गांभीर्यानं ऐकला. आम्ही याबद्दल त्यांना विस्तृत पत्रं दिली. ते निश्चितपणे हा प्रश्न सोडवतील,' अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल मोदींसोबत चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षण न्यायालयानं रद्द केलं आहे. हा देशपातळीवरील विषय आहे. याशिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा विषयदेखील संवेदनशील आहे. याबद्दलदेखील मोदींसोबत चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा, थकलेला जीएसटी, शेतकऱ्यांचं पीक कर्ज, त्यांच्या अटींचं सुलभीकरण याबद्दलही चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.