नवी दिल्ली – काही महिन्यांपूर्वी बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी तिथे एक विधान केले होते. त्यावरून भारतात विरोधकांनी पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यावेळी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आंदोलन केले होते. तेव्हा मला जेलमध्ये जावं लागलं होतं असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांची खिल्ली उडवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) म्हणाले होते की, मी २०-२२ वर्षाचा होतो. तेव्हा बांगलादेश मुक्ती संग्राम लढा सुरू होता. त्यावेळी मी आंदोलनात उतरलो होतो. मला जेलमध्येही जावं लागलं होतं. या विधानावरून विरोधी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आरटीआयद्वारे पीएमओ कार्यालयाला प्रश्न विचारला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या जेलमध्ये शिक्षा झाली होती. त्यावर पीएमओ कार्यालयाने उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पीएमओ कार्यालय केवळ पंतप्रधान कार्यकाळातील रेकॉर्ड ठेवते. त्यामुळे नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ मध्ये पंतप्रधान बनले त्यानंतरचा रेकॉर्ड कार्यालयाकडे अधिकृतपणे उपलब्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केले. तर विरोधक म्हणतात की, पीएमओ वेबसाईटवर नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत १९५० च्या घटनांचा उल्लेख आहे. त्यात म्हटलंय की, नरेंद्र मोदी अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आले होते. त्यांच्याकडे पैसेही उपलब्ध नव्हते.
आरटीआयमध्ये काय विचारलं?
आरटीआय(RTI) द्वारे पीएमओ कार्यालयाला मोदी यांच्या जेलमधील कालावधीबाबत विचारणारे राजेश चिरिमार हे टीएमसी बिधाननगर महानगरपालिकेचे बोर्ड सदस्य आहेत. त्यांनी २६ मार्च रोजी आरटीआय अर्ज केला होता. चिरिमार यांनी आरटीआयमधून पंतप्रधान कार्यालयाला ३ प्रश्न विचारले होते. कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत नरेंद्र मोदी जेलमध्ये होते? मोदी यांना कोणत्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलं होतं आणि कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं? मागील आठवड्यात आरटीआयचं उत्तर चिरिमार यांना देण्यात आले. या पीएमओ जनसंपर्क विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे रेकॉर्ड पीएमओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्याशिवाय पीएमओ कार्यालयाने २०१४ पासून जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तेव्हापासून रेकॉर्ड जतन केला आहे.
बांगलादेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या ५० स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी ढाका येथे प्रमुख पाहुणे म्हणून भाग घेण्यास गेले होते. तेव्हा ते म्हणाले की, बांगलादेश स्वातंत्र्याच्या संघर्षात सहभागी होणं हे माझ्या जीवनातील पहिल्या आंदोलनापैकी एक आहेत. त्यावेळी माझं वय २०-२२ वर्ष होतं. जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या त्या लढ्यात मला अटक करून जेलमध्येही पाठवण्यात आलं होतं.