मुंबई – भरमसाठ वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेचा उद्या राज्यभरात मोर्चा होणार असून मुंबई आणि ठाण्यात मनसे ताकदीनं मोर्चा काढणार आहे, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबईत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा धडकणार आहे, वीजबिलात सरकारने सुरुवातीला सवलत देऊ असं जाहीर केले परंतु त्यानंतर सरकारने घुमजाव केल्याने मनसेनं हा मोर्चा काढला आहे.
मुंबईत होणाऱ्या या धडक मोर्चाला शहरातून मनसे कार्यकर्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचतील, याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमतील त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ शकतं, तसेच याच जवळ परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री हे निवासस्थान असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
तर दुसरीकडे उद्या दुपारी १ वाजता ठाण्यातील मनसेच्या मोर्चाला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली. बुधवारी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आपण काढत असलेल्या मोर्चास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटीसीत म्हटले आले. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी लोकांच्या हितासाठी हा मोर्चा निघणार असल्याचे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी
आपला मुख्यमंत्री आपले दुर्दैव असून ती आता आपलीच जबाबदारी असल्याचं सांगत मनसेचे संदीप देशपांडे यांनी घणाघात केला होता. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मनेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण अजूनही वाढीव वीजबिलाचा मुद्दा ऐरणीवर आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.
तर पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्षांना समज द्यावी, आंदोलन करून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि मनसेचं नाव न घेता त्यांच्या आंदोलनावर भाष्य केले होते.