राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर रेमडेसीवीर इंजेक्शनवरून (Remdesivir injection) केलेल्या आरोपामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले होते. यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.. (Police detained Daman's company Bruck pharma owner for Remdesivir issue)
दमणच्या ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राला रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यास पुढाकार घेतला होता. त्याला पोलिसांनी अचानक ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीच्या मालकाला पार्लेच्या पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवण्यात आले होते. त्याला बीकेसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले . यामुळे फडणवीस आणि दरेकर या पोलीस ठाण्याकडे निघाले. (LoP Devendra Fadnavis reaching Parle Police station along with LoP Pravin Darekar, Now moving to Manjunath Shinge office, DCP Zone 8.)
महत्वाचे म्हणजे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे अलीकडेच दमनला या कंपनीमध्ये गेले होते. तेथे त्यांनी रेमडेसीवीरची ५० हजार इंजेक्शने बुक केल्याचे सांगितले होते. प्रदेश भाजपतर्फे राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स भेट देण्यात येणार होती. राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजपने राज्य शासनाला मदतीचा हात पुढे केला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर ५० हजार रेमडेसिविर खरेदी करण्याचे ठरले. दमणमधून ही इंजेक्शन्स आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी लागते. ती मंगळवारपर्यंत मिळणार आहे, असे लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.
सरकार पत्र देणारदरेकर यांनी दमणमधूनच राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली. दमणमधून ही इंजेक्शन्स महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक पत्र दिले जाईल, असे आश्वासन शिंगणे यांनी आम्हाला दिले आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
पावणेपाच कोटी खर्चदमणमधून इंजेक्शन्सचा साठा आल्यानंतर तो फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले होते. ९५० रुपये प्रत्येकी याप्रमाणे ५० हजार इंजेक्शनसाठी ४ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च प्रदेश भाजपने केला होता.
नवाब मलिकांनी काय आरोप केला?
केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार दिला आहे. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणार्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकार पुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.