Vasantrao Deshmukh Jayashree Thorat: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांची संगमनेरमधील धांदरफळ येथे युवा संकल्प सभा झाली. या सभेत बोलताना भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर पातळी सोडून टीका केली. त्यांच्या विधानाचे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभर पडसाद उमटले आहेत. वादग्रस्त विधानाची दखल घेत महिला आयोगाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वसंतराव देशमुख यांच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला.
सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे नेते वसंतराव देशमुख जयश्री थोरात यांचं नाव घेत म्हणाले की, "तुला सुद्धा पोरं कशी झाली हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा नाहीतर आम्ही निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही", असे असा इशारा बाळासाहेब थोरात यांना वसंतराव देशमुख यांना दिला.
या विधानाचे लागलीच संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यात हिंसक पडसाद उमटले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. याबद्दल राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, राज्य महिला आयोगाने या विधानाची नोंद घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
वसंतराव देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतराव देशमुख यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षकांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करून कारवाईचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
महिला आयोग खपवून घेणार नाही
रुपाली चाकणकर म्हणाल्या, "महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र साधूसंतांची भूमि म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्रात अशा पद्धतीने एखाद्या महिलेवर अश्लील अश्लाघ्य भाषेत कुणी विधानं करत असेल, टीका टिप्पणी करत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही", असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
सुजय विखेंच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड
हा कार्यक्रम आटोपून परत निघालेल्या सुजय विखे यांचा ताफा अडवण्यात आला होता. या ताफ्यातील काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. चिखली गावाजवळ जाळपोळीचा प्रकार घडला.
या विधानाबद्दल बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, 'अशाप्रकारे विधान करणं चुकीचं आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पण पोलिसांनी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा. दंगल घडवण्याचं काम कोण करत आहे? हे पोलिसांनी पाहावं', अशी मागणी त्यांनी केली.