भोपाळ: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये वातावरण तापलं आहे. भोपाळ मतदारसंघात काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजपानं हिंदू दहशतवादावरुन दिग्विजय सिंह यांना सतत लक्ष्य केलं आहे. यानंतर आता सिंह यांच्या रॅलीत पोलीस कर्मचारी चक्क भगवं उपरणं घातलेले दिसून आले.
आम्हाला साध्या वेशात आणि भगवं उपरणं घालून येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती यावेळी उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं दिली. यानंतर मध्य प्रदेशातलं राजकीय वातावरण तापलं. मात्र भोपाळच्या पोलीस उपमहासंचालकांनी याचा इन्कार केला. रोड शोला सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस साध्या वेशात उपस्थित होते. मात्र त्यांनी भगवं उपकरण घातलं नव्हतं, असं उपमहासंचालकांनी सांगितलं. मध्य प्रदेशात आज काँग्रेस सोबतच भाजपाचाही रोड शो आहे. यात साध्वी प्रज्ञासिंह यांच्या प्रचारासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा सहभागी होणार आहेत. दिग्विजय सिंह यांच्या रोड शोला पोलीस साध्या वेशात आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. याबद्दल विचारलं असता, आम्हाला वरुन तशा सूचना देण्यात आल्याचं एका महिला पोलिसानं सांगितलं. दिग्विजय सिंह यांच्या रॅलीमध्ये कॉम्प्युटर बाबांसह अनेक साधू-संत सहभागी होणार आहेत. भोपाळमध्ये 12 मे रोजी मतदान होणार आहे. दिग्विजय सिंह यांना हिंदू दहशतवादावरुन सतत लक्ष्य करणाऱ्या भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी काल (मंगळवारी) सिंह यांनी हवन केलं. यानंतर आज त्यांनी पत्नीसह मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत कॉम्प्युटर बाबादेखील उपस्थित होते. देशातले 7 हजार साधू तीन दिवस भोपाळमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती कालच कॉम्प्युटर बाबांनी दिली. या काळात सर्व साधू हठ योग आणि रोड शो करतील, असंदेखील ते म्हणाले होते. हे साधू 13 आखाड्याशी संबंधित असल्याचा दावादेखील त्यांनी केला.