कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं लोक पुन्हा बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. तब्बल दीड वर्षापासून मास्क, फिजिकल डिस्टन्स वैगेरे नियम पाळल्यानंतर हे नियम आता लोकांच्या अंगवळणी पडले आहेत असे वाटत होते. फोनच्या कॉलर ट्यूनमधील बाई कोरोना अभी गया नही, तीन बाते याद रखे असे म्हणून किती कॅसेट घासत राहिली तरी लोक आता ऐकायला तयार नाहीत. ग्रामीण भागात तर लोकांनी मास्क केव्हाच काढून फेकले आहेत. गेल्या आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान जोमाने सुरू आहे.
या निमित्ताने पदाधिकारी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांची निवेदनही स्वीकारत आहेत. पण हे करताना सामाजिक अंतर सोडा, तोंडावर मास्कही लावण्याचं भान कुणाला राहत नाही. एका सज्जनाने सहज याबद्दल प्रश्न केला. त्यावर एक कार्यकर्ता म्हणाला, भाऊ किती दिवस एवढे बंधनात राहायचे, खूप झाले ना..गेला कोरोना आता....
संकटकाळातदेखील विरोधकांना चिमटे
कोकणात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. एरवी सोशल माध्यमांवर सक्रीय असणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या कालावधीत सातत्याने जनतेच्या प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून संपर्कात राहणे अपेक्षित होते. मात्र ती दिवसांत त्यांनी या घटनेसंदर्भात शोक व्यक्त करणारे तीन आणि टोल फ्री क्रमांकाची माहिती देणारे एक असे एकूण चारच ट्विट केले आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे संघ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विरोधकांवर टीका करणाऱ्या त्यांच्या ट्विटची संख्या जास्त आहे. संकटकाळात राज्यातील मंत्र्याने सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. मात्र पक्षातीलच अंतर्गत गटबाजी व विरोधकांवर टीका करण्यात ते व्यस्त असल्याने सोशल माध्यमांवर त्याचेच प्रतिबिंब उमटत आहे. मंत्र्याने पुढाकार घेतला तर अधिकारी कामाला लागतात असे म्हटले जाते. मात्र संकटकाळात जनतेच्या समस्या दूर करण्यापेक्षा विरोधकांना चिमटे काढण्यावरच नेत्यांचा भर असेल तर अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार?
(ही कुजबुज योगेश पांडे, अंकुश गुंडावार, मनोज ताजने, ज्ञानेश्वर मुंदे, सुरेंद्र राऊत यांनी लिहिली आहे)