नवी दिल्ली : जातीयवादी विखारी प्रचार करून प्रचाराचे वातावरण कलुषित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी भाजपचे ‘स्टार प्रचारक’ व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व बसपच्या प्रमुख मायावती यांची शब्दांत निर्भत्सना करत, यांच्यावर प्रचारबंदी लागू केली.योगींवरील प्रचारबंदी ७२ तासांची (तीन दिवस) तर मायावतींवरील बंदी ४८ तासांची (दोन दिवस) असेल. बंदीमंगळवार सकाळपासून लागू होईल. या काळात त्यांना सभा, मिरवणुका, रोड शोद्वारे प्रचार करता येणार नाही. प्रसिद्धी व समाजमाध्यमांतूनही निवडणुकीशी संबंधित वक्तव्ये करता येणार नाहीत.योगींनी सांप्रदायिक सलोखा बिघडून दोन समाजांत वितुष्ट निर्माण होईल, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केला, असा ठपका आयोगाने ठेवला. मायावतींवरही असाच ठपका धर्माच्या नावे मते मागितल्याबद्दल ठेवला. प्रचाराच्या काळात हा प्रमाद आदित्यनाथ यांच्याकडून दुसऱ्यांदा घडल्याने मायावती यांच्या तुलनेत त्यांना जास्त कडक शिक्षा केली गेली. या आधी आयोगाने आदित्यनाथ यांना जाहीर वक्तव्ये करताना भान राखण्याची तंबी ५ एप्रिल रोजी दिली होती.मेरठमधील सभेत आदित्यनाथ यांनी मुस्लिमांचा उल्लेख ‘हिरवा विषाणु’ असा केला होता व अलीला नव्हे, तर बजरंगबलीला मते देण्याचे आवाहन केले होते. मायावती यांनी सहारनपूरमध्ये सर्व मुस्लिमांनी या मुस्लीम उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन केले होते. आयोगाने नोटिसा काढताच दोघांनीही सारवासारव करणारी उत्तरे दिली, पण वक्तव्ये केल्याचा इन्कार केला नाही. आयोगाने दोघांच्याही भाषणांचे व्हिडीओ पुन्हा पाहिले व अशी वक्तव्ये केल्याची खात्री करून घेतली.>सुप्रीम कोर्टातही विषयही कारवाई झालेली असतानाच विखारी व प्रक्षोभक प्रचार रोखण्यात आयोगाच्या अधिकारांना काही मर्यादा आहेत का, हा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे आला. आम्ही नेत्यांविरुद्ध कारवाई करू शकतो, परंतु या कारणास्तव चुकार राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याचा अधिकार आम्हाला नाही, अशी भूमिका आयोगाने घेतली. सरन्यायाधीश न्या. गोगोई यांच्या खंडपीठाने हा विषय लगेच उद्या मंगळवारीच तपासून पाहण्याचे ठरविले व त्यासाठी आयोगाच्या एखाद्या ज्येष्ठ व जबाबदार अधिकाºयाने जातीने हजर राहावे, असे सांगितले.
राजकीय नेत्यांना झटका; योगी, मायावतींवर प्रचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:35 AM