जळगाव – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात भेट झाली आणि राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा होता, शरद पवारांपासून, काँग्रेस नेत्यांना एकत्र आणत शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात विराजमान झाला. मात्र युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आणि राऊत भेट झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण दोन्ही नेते देत आहेत. मात्र राजकारणात जे सांगितलं जातं तसेच सगळं असतं असं नाही, त्याच फडणवीस आणि राऊत भेटीवर मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले की, राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो, ही विचारांची लढाई असते, एखाद्याच्या लग्नसमारंभात, अंत्ययात्रेत जातो, अनेक कार्यक्रमात जातो तसंच फडणवीस आणि राऊत भेट झाली असावी, भाजपा आणि शिवसेना यांचा एकमेकांशी ओढा वाढला की नाही, याबाबत मी मत मांडू शकत नाही, तो ओढा तयार करण्याची जबाबदारी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आहे. नेते जो आदेश करतील तो आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत असं सांगत त्यांनी भविष्यात काहीही होऊ शकते याचेच संकेत दिले.
तसेच कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट होणे गैर नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात भेटीत राजकीय उद्देश नव्हता. सामनाच्या मुलाखतीसाठी त्यांची भेट झाली, हे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्ष वेगवेगळे असले तरी एक नेता दुसऱ्या नेत्याला भेटू शकतो. संजय राऊत हे वृत्तपत्रात प्रमुख आहेत, त्यांची काही चर्चा असू शकते, पण चर्चेला वेगळं वळण द्यावं असं नाही, एकमेकांना भेटू शकत नाहीत का? असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. जळगावात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी उत्तरं दिली.
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात झाली होती २ तास गुप्त बैठक
सांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये शनिवारी दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नव्हता. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है" त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे हा प्रश्न आहे. मात्र फडणवीस राऊत बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला. एकमेकांना न भेटायला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात. पण वैयक्तिक वाद होत नाहीत. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शिवसेना नेते संजय राऊत यांना सामनासाठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यांनी त्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. त्यावर मी जरूर मुलाखत देईन असं त्यांना म्हटलं. पण माझ्या काही अटी, शर्ती आहेत. मुलाखत घेताना तिथे माझाही कॅमेरा असेल, अशा माझ्या काही अटी, शर्टी आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकदा भेटून बोलू असं ठरलं होतं. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो घेतो, असं फडणवीस म्हणाले. भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही, हे सरकार स्वत:च्या कृतींमुळेच कोसळेल, या विधानांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबद्दल भाजपाची कुठलीही चर्चा नाही. तशी चर्चा करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनात आक्रोश आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही करत आहोत. हे सरकार आपल्या स्वत:च्या कृतीनं खाली कोसळेल. त्यावेळी काय करायचं ते तेव्हा बघू. सरकार स्थापनेची आम्हाला कुठलीही घाई नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.