अहमदाबाद – बिहार विधानसभा निवडणुकीसोबत देशातील अन्य राज्यात पोटनिवडणुका होत आहेत. यात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत आहे. गुजरातमध्येही विधानसभेच्या जागेसाठी घेण्यात येत असलेल्या पोटनिवडणुकीचं आज मतदान आहे. मात्र या मतदानाच्या दिवशी भाजपा कार्यकर्त्यांकडून लोकांना पैसै वाटत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
गुजरातमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसने मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल केली. व्हिडिओमध्ये एक भाजपा कार्यकर्ता मतदान करण्यासाठी निघालेल्या लोकांना पैसे देताना दिसत आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनंतर सीईओ डॉ. मुरलीकृष्ण यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. कॉंग्रेसचे प्रवक्ते जयराजसिंह परमार यांनी फिर्याद दिली आहे. व्हिडीओमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मत देण्यासाठी चाललेल्या मतदारांना पैसे देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ कर्जन मतदारसंघातील मतदान केंद्रावरचा आहे.
काँग्रेसचा आरोप आहे की, भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कर्जन सीटमधील इंटोला आणि गोसींद्र या गावात मतदारांना पैसे वितरित केले. कॉंग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर कर्जन सीटचे नोडल अधिकारी बी.बी. चौधरी हे पथकांसह तपासासाठी रवाना झाले आहेत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही पैसे वाटप करत असल्याचे काही फोटोही प्रसिद्ध केले. गुजरातमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १९.५७ टक्के मतदान झाले. कोरोनामुळे, या वेळी १५०० मतदारांनुसार एका बूथ कमीतकमी १ हजार मतदारांवर बूथ बनविण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मतदार मतदान करू शकतील. कोविड -१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व मतदान केंद्रावर शांत वातावरणात मतदान करण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिले, काँग्रेसचं स्टिंग ऑपरेशन
आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भाजपाने ५ कोटी रुपये दिल्याचं गुजरातमधील काँग्रेसचे तत्कालीन आमदार सोमाभाई पटेल यांनी मान्य केल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी मंगळवारी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोमाभाई पटेल यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणले. या व्हिडिओमध्ये सोमाभाई पटेल यांनी म्हटले आहे की, आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणून भाजपाने मला पैसे दिले होते. नाही तर कारणाशिवाय आमदार आपल्या पदाचा राजीनामा का देईल? राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी कोणालाही १० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले नाहीत. काही जणांना निवडणुकीत उमेदवारी, तर काहींना पैसे देण्यात आले.
गुन्हा दाखल करा
गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा म्हणाले की, भाजपाने आमदारांच्या खरेदी-विक्रीचा घोडेबाजार सुरू केला. भ्रष्टाचार करून मिळविलेला पैसा भाजपने आमदारांना विकत घेण्यासाठी वापरला. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे गुजरातमधील खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणीही अमित चावडा यांनी केली.