मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशनात सरकारला बोलू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आला होता. (Shiv Sena Minister Sanjay Rathod Resigns)मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामाउद्यापासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाणचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यावरून विरोधकांनी राज्यात अतिशय घाणेरडं राजकारण केलं,' असं राठोड म्हणाले.'पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मला राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे. तसं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. तपास होऊ द्या, त्यातून सत्य बाहेर येऊ द्या, अशी भूमिका मी आधीपासूनच केली होती. पण विरोधकांनी अधिवेशन चालू देणार असे इशारे दिले. म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,' असं राठोड यांनी माध्यमांना सांगितलं.राठोड यांना मुख्यमंत्री काय म्हणाले?वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. 'पूजा चव्हाण प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. विरोधकांसोबतच स्वकीयांनीदेखील पक्षावर दबाव टाकला आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे तूर्तास राजीनामा द्या. आपण लवकरच निर्णय घेऊ. आता राजीनामा द्या. निर्दोष असाल तर पुढे विचार करू,' असं मुख्यमंत्र्यांनी वर्षावरील बैठकीत राठोड यांना सांगितल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.
Pooja Chavan Death Case: ...म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला; संजय राठोडांनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 4:39 PM