मुंबई – बीडच्या पूजा चव्हाण(Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाव आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. परळीत राहणाऱ्या या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या(Suicide) केली. त्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीने या प्रकरणात महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर सध्या या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. (BJP MLA Nitesh Rane Target Shiv Sena over Pooja Chavan Suicide Case)
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांवर भाजपा(BJP) आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, या महाविकास आघाडी सरकारच्या दूरदृष्टीला सलाम, पर्यावरण मंत्र्यांची दिशा चुकली, मग आता वनमंत्री पूजा घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. बाकी मंत्र्यांचे पण कहानी घर घर की चालू आहे, म्हणूनच जेल पर्यटन सुरू केले असावे. जनता मंत्र्यांना अजून कुठे भेटणार? असा चिमटा त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला काढला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं जेल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरून नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.
इतकचं नाही तर जे दिशा बरोबर झाले तेच पूजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही असा सवालही आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राठोड यांच्या मुसक्या कधी आवळणार असं त्यांनी म्हटलं होतं.
आरोपांची सखोल चौकशी होईल– मुख्यमंत्री
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) या प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे.
महिला आयोगाकडून दखल
राष्ट्रीय महिला आयोगाने पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी(Pooja Chavan Suicide Case) राज्य शासनाकडून विस्तृत अहवाल मागितला आहे. या प्रकरणी होत असलेल्या विविध आरोपांबाबतची वस्तुस्थिती काय, अशी विचारणादेखील आयोगाने केली आहे.
हकालपट्टी करा; भाजपची मागणी
राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली. राठोड यांना मंत्रिमंडळातून हटविले जात नसेल तर त्याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्री संरक्षण देत आहेत असा होईल. पुरावे लक्षात घेता राठोड यांचा पूजा चव्हाण आत्महत्येची संबंध असल्याचे दिसते असे ते म्हणाले.