मानोरा (जि. वाशिम) : ‘टिकटॉक’ स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर अज्ञातवासात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे हजारो समर्थकांच्या गराड्यात तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे मंगळवारी सपत्नीक पोहोचले. मीडिया व जनतेला सामोरे गेले. शक्तिप्रदर्शनाच्या प्रयत्नात कोरोना जमावबंदी आदेशाला मंत्री आणि त्यांच्या समर्थकांनीच फाटा दिला. गर्दीतील काहींनी दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीमार केला.
पूजा प्रकरणाच्या आड समाजात बदनामी करण्याचे घाणेरडे राजकारण खेळून तीस वर्षांचे राजकीय जीवन संपवण्याचा घाट घातला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले. विराेधकांकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यात सर्व बाबी स्पष्ट होतील, असे सांगतानाच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, अशी विनंती त्यांनी केली. राठोड यांनी प्रारंभी जगदंबादेवी व संत सेवालाल महाराज आणि बाबनलाल महाराज, संत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीचे सपत्नीक दर्शन घेतले.
मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत माध्यमातील बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच वाशिम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या.
माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात
सोशल मीडियावर व्हायरल पूजासोबतच्या फोटोंबाबत राठोड म्हणाले, गेली ३० वर्षे सामाजिक-राजकीय जीवनात आहे. यानिमित्ताने अनेक लोक माझ्यासाेबत फोटो काढतात. मी १५ दिवस गायब नव्हतो. मुंबईतील फ्लॅटवरून शासकीय कामकाज करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवा, असेही ते म्हणाले.