मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानं शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदापासून दूर जावं लागलं आहे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला होता, परंतु ४ दिवस उलटले तरी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे पाठवण्यात आला नाही, याबद्दल विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. (Governor Bhagat Singh Koshyari approved the resignation of Sanjay Rathod, the additional charge of the forest will be held to Chief Minister Uddhav Thackeray)
अखेर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.
...अन् संजय राठोडांची ‘ती’ विनंती अमान्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दणका दिलाच
ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, या ऑडिओ क्लिपमुळे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत भर पडली, संजय राठोड हे पूजाच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असा आरोप विरोधकांनी केला, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली. एकीकडे विरोधकांचा वाढता दबाव आणि दुसरीकडे संजय राठोड यांचे पूजाच्या मृत्यूनंतर १५ दिवस मौन बाळगणं, त्यामुळे या प्रकरणाने ठाकरे सरकारभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं, संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवली.
पोहरादेवी गडावरील शक्तिप्रदर्शन, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव येणे, या सगळ्या गोष्टींमुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच सापडली, त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांनी नैतिकतेच्या आधारे हा राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलं.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
पूजा चव्हाण प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे संजय राठोड अडचणीत आले. राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटो व्हायरल झाले. कथित ऑडिओ क्लिपमुळेदेखील राठोड यांच्या समस्या वाढल्या. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतला. त्यानंतर रविवारी राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्याच संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राठोड यांचा राजीनामा काही फ्रेम करून लावण्यासाठी घेतलेला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.