मुंबई – परळीतील पूजा चव्हाण(Pooja Chavan) या २२ वर्षीय तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण हीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झालीय असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी(Kirit Somaiya) करत मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.(Minister Sanjay rathod will be arrest in Pooja Chavan Suicide Case Demand by BJP Ex MP Kirit Somaiya)
याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) शरद पवारांच्या(Sharad Pawar) निरोपाची वाट पाहतायेत का? पूजा चव्हाणची आत्महत्या नव्हे तर हत्या, त्यासाठी मंत्री संजय राठोड जबाबदार आहेत, संजय राठोड यांची हकालपट्टी नाही तर त्यांना अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आलं आहे. संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे, पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात १०-१२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.(Pooja Chavan Suicide Case)
संजय राठोड प्रकरणावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह
शिवसेनेत(Shivsena) देखील या मुद्द्यावरुन दोन मतप्रवाह निर्माण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा एक मोठा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील असा शिवसेनेते एक मतप्रवाह आहे.
तर पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. बंजारा सामाजाने आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. त्याच्याच जोरावर संजय राठोड वाचण्याची शक्यताही बोलली जातेय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील द्विधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
संजय राठोड मौन सोडणार?
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.