- श्रीनिवास नागेसांगली मतदारसंघात महाआघाडीतील उमेदवारीचा घोळ संपल्यानंतर प्रचाराचे नियोजन करताना आता नाराजांच्या नाकदु-या काढण्याचा खेळ सुरू आहे. भाजपमध्येही खप्पा झालेल्या नेत्यांच्या मनधरणीचा प्रयोग जोमात आला आहे. वाढती गटबाजी आणि खमक्या उमेदवाराअभावी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सांगलीची जागा महाआघाडीतील मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावर कार्यकर्ते चिडले. तेव्हा अस्मिता दुखावलेल्या वसंतदादा घराण्यातील दादांचे नातू विशाल पाटील लढण्यासाठी पुढे आले. त्यांचा आग्रह काँग्रेसच्या तिकिटासाठी होता. मात्र, जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्यावर नेते ठाम होते. त्यातच ‘स्वाभिमानी’लाही तगडा उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे अखेर विशाल पाटील यांना ‘स्वाभिमानी’कडून रिंगणात उतरावे लागले. आक्रमक आणि ‘तरुण तुर्क’ नेते असलेल्या विशाल यांच्याकडून काँग्रेसमधील पतंगराव कदम गट आणि राष्टÑवादीतील जयंत पाटील गट दुखावले गेले आहेत. आता त्यांच्या नाकदुºया काढण्यात ताकद खर्ची पडत आहे.भाजपमध्येही विद्यमान खासदार संजय पाटील यांनी तिकीट मिळविण्याची शर्यत जिंकली खरी, पण त्यानंतर पक्षांतर्गत नाराजांची मनधरणी करण्यातच त्यांचा वेळ गेला. पक्षातील आमदार आणि प्रमुख नेतेच त्यांच्या विरोधात होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पाटील यांचे पक्षातील विरोधक कामाला लागले. महाआघाडी आणि महायुतीमध्ये सगळे काही आलबेल असल्याचे, नाराजांचे मन वळवल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र, अंतर्गत धुसफुस वाढीस जाऊन आतून एकमेकांची जिरवाजिरवी करण्याचा खेळ केव्हाही रंगू शकतो. जिल्ह्याचा पूर्वेतिहास तेच सांगतो!
नाराजांच्या नाकदुऱ्या काढण्यातच ताकद खर्ची
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 4:46 AM