पुणे: राज्यातील लोकसभेच्या अनिर्णित जागांसंबधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुंबईत ८ मार्चला वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची बैठक दिल्लीत ९ मार्चला होणार असून तत्पुर्वी प्रदेश शाखेकडून काही वादग्रस्त जागांवरील नावे दिल्लीत पाठवली जातील. त्यातच पुण्याच्या जागेचाही समावेश आहे. नगर (दक्षिण) व पुणे लोकसभेच्या जागेची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देवाणघेवाण होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. पुण्याची काँग्रेसची जागा राष्ट्रवादीला द्यायची व त्या बदल्यात नगर (दक्षिण) ची राष्ट्रवादीकडे असलेली जागा काँग्रेसला द्यायची असा हा प्रकार आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सूजय विखे यांना नगर (दक्षिण) मधून निवडणूक लढवायची आहे तर पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या जागेसाठी आग्रह आहे. मात्र कार्यकर्त्यांचा विरोध लक्षात घेऊन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या चचेर्ला आता पूर्णविराम दिला असल्याचे समजते. दोन्ही जागा त्यात्या पक्षांकडेच राहणार असून त्यावर उमेदवार कोण यासंबधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे नगरचे आमदार अरूण जगताप यांनी नगर (दक्षिण) मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंगळवारी त्यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली. त्यांचे समर्थकही त्यांच्यासमवेत होते. पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसची अडचण झाली आहे. पक्षाकडून माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड ही दोन नावे केंद्रीय शाखेकडे पाठवली असली तरीही शेतकरी कामगार पक्ष व संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी प्रविण गायकवाड व भाजपाचे सध्याचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही या जागेवरून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांचा त्यांना विरोध आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या नावांसाठी काँग्रेसवर दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीची बैठक पक्षाध्यक्ष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मार्चला मुंबईत होत आहे. त्यात पक्ष लढवणार असलेल्या सर्व जागांवरचे उमेदवार नक्की केले जातील अशी माहिती मिळाली. राजू शेट्टी यांचा स्वाभीमानी शेतकरी संघटना, जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे आणखी काही पक्ष या दोन्ही प्रमुख पक्षांच्या आघाडीत आहेत. काही पक्ष काँग्रेसकडून तर काही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. एकूण ४८ जागांपैकी दोन्ही प्रमुख पक्षांकडे प्रत्येकी २४ व त्यानंतर त्यांनी त्यांच्या कोट्यातून त्यांच्या घटक पक्षाला जागा द्यायच्या असे सर्वसाधारण सूत्र जागावाटपासंबधी ठरवण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा देणार असल्याची माहिती मिळाली.
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनिर्णित जागांचा तिढा महिला दिनाच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:59 PM
नगर (दक्षिण) व पुणे लोकसभेच्या जागेची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देवाणघेवाण होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे.
ठळक मुद्देअनिर्णित जागांचाही होणार निर्णयपुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या जागेसाठी आग्रहस्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा देणार असल्याची माहिती