लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिसऱ्या लाटेच्या अंदाजानंतरच घ्याव्यात. वेळ पडल्यास या निवडणुका काही काळ पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करावी, असा सूर मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य टास्क फोर्सचे काही प्रमुख सदस्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन तिसऱ्या लाटेच्या अंदाजाविषयी त्यांच्याशी चर्चा करतील. पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाख लोकांपर्यंत गेली होती. आता तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक महाराष्ट्रात बाधित होतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला किमान १२ टक्के ऑक्सीजन बेडची गरज पडणार आहे. ही सगळी माहिती आयोगाला द्यावी, आणि जर रुग्ण संख्या वाढू लागली तर निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलाव्या अशी विनंती आयोगाला करावी, अशी चर्चा बैठकीत झाली.
एक हजार रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. ५०० रुग्णवाहिका आल्या असून, उर्वरित ५०० सप्टेंबरअखेर प्रत्येक आरोग्य केंद्रांपर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रात १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका मिळतील असे सांगून टोपे म्हणाले, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या वतीने, ५ हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी कर्ज घेण्याचा विषय आहे.
केरळमध्ये ओनम सणानिमित्ताने जिथे मोठी गर्दी झाली होती, तिथे आता कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी फोनवर बोललो. ३१ हजार केसेस एका दिवसात कशा आल्या, याची विचारणा केली. तपासणी वाढवली आणि सणामुळे झालेली गर्दी ही कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्टमध्ये देशस्तरावर कमी बाधित केरळमध्ये ४२ टक्के आहेत. त्या खालोखाल ५५ टक्के महाराष्ट्रात आहेत, असे ते म्हणाले.
आग्रीपाडामध्ये अनाथाश्रमात २२ कोरोनाबाधितकांदिवली (पश्चिम) येथील निवासी संकुलात १७ रहिवाशी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता आग्रीपाडा येथील एका अनाथाश्रमात २२ जणांना संसर्ग झाला आहे. यात १८ वर्षांखालील १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व बाधितांवर पालिका रुग्णालय आणि कोविड केंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीसाठी महापालिकेने अनाथाश्रम सील केले आहे.