भोपाळभोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या एका कार्यक्रमात व्यासपीठावर मागची खुर्ची मिळाल्यानं संतापल्या आणि कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे.
भोपाळमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयाचा उदघाटन होतं. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा आणि खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर उपस्थित होत्या. पण जेव्हा व्यासपीठावर जाण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला मागच्या रांगेत खुर्ची देण्यात आल्याचं पाहून साध्वी प्रज्ञा नाराज झाल्या.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी यावेळी स्थानिक नेत्यांना बोलून दाखवलं. स्थानिक भाजप नेत्यांकडून यावेळी प्रज्ञा सिंह यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला गेला. पण संतापलेल्या साध्वी प्रज्ञा या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराजसिंह येण्याआधीच तिथून निघून गेल्या.
दुसऱ्या कार्यक्रमात जाहीर व्यक्त केली नाराजीपक्षाचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाताना साध्वी प्रज्ञा सिंह काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी कोणतंही भाष्य करणं टाळलं. पण त्यानंतर आणखी एका कार्यक्रमात त्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.
"कोणतीही गोष्ट अर्धवट बोलणं हे तुमच्या व्यक्तीत्वाला अपूर्ण ठरवतं. यापेक्षा जास्त मी काहीच बोलू इच्छित नाही. ज्यांना समजलं असेल ते ठीक आहेत. ज्यांना नसेल समजलं ते अनाडी आहेत. खुर्चीच्या ओढाताणीत आज मीही फसले आहे. आतापर्यंत या ओढाताणीत मी अडकले नव्हते", असं साध्वी प्रज्ञा भोपाळच्या मानस भवन कार्यक्रमात एका प्रवचनादरम्यान म्हणाल्या.