मुंबई- भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीशरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दाऊद भारतात येण्यास तयार होता, पवारांनी मध्ये खोडा घातला, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुषमा स्वराज्य यांनी दोन दिवसांपूर्वी दाऊद आणि मसूद अझहर यांना भारतास सोपविण्याची मागणी केली. मात्र काही वर्षांपूर्वी स्वतः दाऊदने भारतात परत येण्याची इच्छा राम जेठमलानी यांच्याकडे व्यक्त केली होती. जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवारांना दिली होती. याबाबत तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांनी याबाबतची माहिती तत्कालीन पंतप्रधानांना दिली होती का? यंत्रणांना दिली होती का? किंवा दाऊदच्या समर्पणाचा निर्णय त्यांनी स्वतःच्या पातळीवर का नाकारला, याचे शरद पवारांनी उत्तर द्यावे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.1993च्या मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीचा मास्टर माइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या, अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत देखील सहभागी होऊ इच्छितो, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता. परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं. तसेच या निर्णयात यूपीए सरकारसुद्धा सहभागी आहे, असे सांगितले.जर दाऊद समर्पण करायला तयार होता, तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करून घेतले नाही, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. तसेच ज्यावेळी हे सर्व उघड झाले, त्या वेळी म्हणजेच 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बीजेपी सरकार होते, मग त्यांनी सुद्धा दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. काँग्रेस कोणत्या आधारावर राष्ट्रवादीसोबत आघाडी करत आहेत. दाऊद शरण येत असताना त्यात खोडा घालणारे शरद पवारांशी आघाडी कशी करता. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी दाऊदप्रकरणी खोडा घालणा-या पवारांच्या घरी कसे काय जातात, याचे उत्तर मोदींनीही द्यावे. थर्ड डिग्री लावू नका, इतकीच दाऊदची मागणी होती. जेठमलानी यांनी या भेटीबाबत आणि दाऊदच्या शरण येण्याच्या इच्छेबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना अवगत केले होते. मात्र पवारांनी ही माहिती दडवून ठेवल्याची टीकाही आंबेडकरांनी केली आहे.
पवारांनी माहिती दडवल्यानंच आज देशावर भीक मागायची वेळ- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 1:14 PM