कोल्हापूर : प्रकाशअण्णा...., राग करू नका कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोल्हापुरातील सीपीआरच्या धर्तीवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातील सेवा लवकरच सुरू होतील, असेही आवाहन त्यांनी केले आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाला मी आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी १५ मे २०२१ रोजी भेट दिली होती. त्यावेळी आम्ही दोन घोषणा केल्या होत्या. सिटीस्कॅन तात्काळ मंजूर करू आणि आयजीएम रुग्णालयाची दर्जोन्नती करून बेड वाढवून आयजीएम हे सीपीआरच्या धर्तीवर करू.
त्यानंतर मुंबईला २४ मे २०२१ तारखेला जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन या बैठकीत तत्त्वतः मान्यता घेतली. रीतसर प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य विभाग व अर्थखात्याने तात्काळ मंजुरी देण्याचे मान्य केले. ५० बेड वाढ व सिटीस्कॅनचे टेंडर निघाले आहे. सहा निविदा धारकांनी प्रतिसाद दिला आहे. खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सिटीस्कॅन आम्ही जेव्हा बसवू, त्यावेळी तेथील विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून आपणास आवर्जून बोलावू , काळजी नसावी. शासनाच्या या संपूर्ण प्रक्रियेत तातडीने एवढ्या दोन गोष्टी करणे आणि मान्यता मिळवून देणे, मला वाटतं अनेक वर्षे या शासनात काम केलेल्या प्रकाश आवाडे यांना किती वेळ लागतो आणि किती जलद हे काम झालं याची जाणीव झालीच असेल.आमदार प्रकाश आवाडे यांना माझी विनंती आहे, असे कोणतेही प्रश्न, समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधा. तात्काळ महाविकास आघाडी त्याला प्रतिसाद देईल.