- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपने पश्चिम बंगालमध्ये जांगीरपूर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि माकपच्या मतांना फाटे फोडण्यासाठी मुस्लिम महिलेला उमेदवारी दिली असली तरी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे.जांगीरपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. कधी तेथून प्रणव मुखर्जी, तर कधी त्यांचा मुलगा जिंकला. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात कट्टर वैर असतानाही मुखर्जी यांना अनेक दशके त्रास झाला नाही. आता मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील ४२ मतदारसंघांमागे आपली शक्ती लावण्याचे ठरवल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. २०१४ च्या निवडणुकीत अभिजित मुखर्जींनी चौरंगी लढतीत फक्त ८ हजार मतांनी विजय मिळवला होता. तेव्हा भाजप राज्यात अजिबात महत्त्वाचा नव्हता, तरीही त्याचे उमेदवार सम्राट घोष यांना ११ लाखांपैकी जवळपास एक लाख मते मिळाली. या मतदारसंघात मतदारांची संख्या खूपच वाढून ती १६ लाखांपेक्षा जास्त झाली आहे व त्यातील ७० टक्के मुस्लिम आहेत. येथे २३ एप्रिल रोजी मतदान होईल.मुखर्जी यांनी मोदी सरकारशी चांगले संबंध निर्माण केले. मोदी सरकारने मुखर्जी यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला व मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यानंतर भाजपने माकपमधून आलेल्या मुस्लिम महिलेला जांगीरपूरमध्ये उमेदवारी दिली. राज्यात माकपची घसरण वेगाने झाली. त्याचे कार्यकर्ते एक तर भाजपमध्ये किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. माकपने तुलनेने नवा चेहरा झुल्फीकार अली यांना, तर तृणमूल काँग्रेसने खलीऊल रेहमान यांना उमेदवारी दिली आहे.भाजपने मुस्लिम मते विभागली जावीत यासाठी मफुजा खातूम यांना उमेदवारी दिली आहे. भाजप सर्व ४२ जागा लढवत आहे. अभिजित मुखर्जी यांना मदत व्हावी यासाठी भाजपने मुस्लिम महिलेला उभे केले. दुसरा एकच मुस्लिम उमेदवार भाजपने दिला, ते तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री हुमायून कबीर. हे दोन अपवाद वगळता देशात भाजपने ४६०पैकी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही.>काय आहेत अडचणी?काळजीत पडलेल्या प्रणव मुखर्जी यांनी आता स्वत: लक्ष घातले आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिजित मुखर्जी यांना मदत न करण्याची ठाम भूमिका घेतली. काँग्रेसला माकपबरोबर निवडणूक युती करण्यात अपयश आल्यामुळे यावेळी अभिजित मुखर्जी यांचे भवितव्य संकटात आहे.
प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अडचणीत, जांगीरपूरमध्ये यशाचा मार्ग कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 4:22 AM