हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेस पक्षात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना समाविष्ट करून घेण्याची शक्यता पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी शोधत आहेत. किशोर यांचा समावेश बोलणी सहजपणे पूर्ण झाली तर सरचिटणीस (व्यूहरचना) किंवा सोनिया गांधी यांचे सल्लागार म्हणून लवकर होऊ शकेल.
प्रशांत किशोर यांच्याशी १५ जुलै रोजी नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सोनिया गांधी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी ए. के. अँटोनी, मल्लिकार्जुन खरगे, कमल नाथ, के. सी. वेणुगाेपाल आणि अंबिका सोनी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे सल्लामसलत केली. प्रियांका गांधी यादेखील वरिष्ठ नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करीत आहेत. भाजपचा आक्रमकपणा आणि पक्षांतर्गत जी-२३ गटाच्या नेत्यांकडून गंभीर धोक्याला काँग्रेस तोंड देत असताना कोणतेही राजकीय वादळ निर्माण होऊ नये यासाठी सोनिया गांधी यांनी हे पाऊल उचलायच्या आधी खूप काळजी घेतली आहे. उच्चस्तरावरील सूत्रांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, प्रशांत किशोर यांनी १५ जुलै रोजीच्या बैठकीत केलेल्या सादरीकरणाने सोनिया गांधी खूप प्रभावित झाल्या. राजकीय विश्लेषकांनी मोदी हे अजिंक्य असल्याचे चित्र रंगवले असले तरी ते तसे नाहीत, असे प्रशांत किशोर यांनी म्हटल्याचे समजते.