नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार हे बिहारचे 37 वे मुख्यमंत्री आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. तसेच जोरदार टीका केली आहे.
प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भाजपाकडून नामनिर्देशित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. मुख्यमंत्री म्हणून थकलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वहीन झालेल्या नेत्याच्या प्रभावहीन सरकारसाठी बिहारने आणखी काही वर्षे तयार असलं पाहिजे" असं म्हणत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
प्रशांत किशोर यांनी गेल्या चार महिन्यांत प्रथमच हे ट्विट केलं आहे. पक्षविरोधी विधानं केल्याप्रकरणी जनता दल संयुक्त (जेडीयू) चे उपाध्यक्ष राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. भाजपा आपल्या मित्रांना निर्जीव होईपर्यंत पिळून घेतो असं देखील सिन्हा यांनी म्हटलं आहे.
"नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल"
यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल" असं म्हटलं आहे. तसेच "आपण मुख्यमंत्री बनणार नाही असं नितीश कुमार एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर म्हटलं होतं. मात्र मित्रपक्षांच्या आग्रहानंतर ते तयार झाले. भाजपाला सर्वाधिक जागा आल्याने त्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री बनावे, असे आपल्याला वाटत असल्याचे नितीश कुमार यांचे म्हणणे होते."