मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शेवट आम्ही करू, असा इशारा दिला आहे. तर भाजपाचे राज्यसभा खासदार आणि शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे यांनी सरनाईक काही साधूसंत नाही, असा आरोप केला आहे.
सरनाईकांच्या घरावर छापे टाकत ईडीने त्याचा मुलगा विहंग याला ताब्यात घेतले आहे. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. तर महाआघाडी सरकारचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात व छगन भुजबळ यांनी या कारवाईचा विरोध केला आहे. 'अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,' असं भुजबळ म्हणाले.
प्रताप सरनाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई आहे आणि कायदेशीर बाबींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. मीडियाने आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे नारायण राणे यांनी सांगितले.
फडणवीसांची प्रतिक्रियाशिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 'राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्याली. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे,' असं फडणवीस म्हणाले. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.