मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेतेमंडळींनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारने सूड भावनेचा परमोच्च बिंदू गाठल्याचं म्हटलं आहे.
प्रविण दरेकर यांनी "महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारी घटना आहे. राज्यपालांच्या विमानाला परवानगी न देऊन सूड भावनेचा परमोच्च बिंदू गाठण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. राज्यपाल या पदाला अवमूल्यन करण्याचं काम सरकारमधील लोक करत आहेत. या पदाची प्रतिमा धुळीला मिळवण्याचं काम काही नेते मंडळी करताहेत" असं म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या सूड भावनेचा अतिरेक झाला आहे. अशा पद्धतीने सूड भावनेने वागलेलं सरकार याआधी महाराष्ट्रात कधीच झालं नसल्याचं म्हणत दरेकरांनी निशाणा साधला आहे.
"राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारून ठाकरे सरकारने प्रथा-परंपरांना हरताळ फासला आहे. राज्याच्या प्रमुख पदी राज्यपाल असतात. राजकारणातील मतभेद समजू शकतो. राज्यपाल घटनात्मक पद असल्याने तिथे अशा पद्धतीने वागणं हे आपल्या लोकशाही प्रणालीला शोभा देणारं नाही. सूड भावना यांच्यामध्ये किती भरलीय हे स्पष्ट होत असून यावरून त्यांनी परमोच्च बिंदू दाखवून दिला आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवायचं. त्यांचं अपयश लोकांपुढे जाऊ नये यासाठी वाद निर्माण करायचा त्यावर लोकांचं लक्ष वळवायचं अशा प्रकारची सरकारची जाणीवपूर्वक भूमिका आहे" असं देखील प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
"राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल"
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी "राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल" असं म्हणत जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी अशी मागणी देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय थांबवावा असं म्हटलं आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.