२०१४ मध्ये जसा मोठा धोका झाला तसा पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत असे विधान करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक नवा वाद तयार केला आहे. हायकमांडने मला पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे. ती मी पार पाडत आहे. मी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात काहीही बोलत नाही. मी भाजपविरोधी बोलतो. भाजपच्या नीतीवर प्रहार करतो, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला नाना पटोले का गेले नाहीत? असा प्रश्न महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला असता, त्यांची पूर्वनियोजित बैठक असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र पटोले यांनी, पवार यांच्या भेटीचे आमंत्रण नव्हते, त्यामुळे आपण गेलो नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा अंतर्गत विसंवादही समोर आला आहे. काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद कमी करण्याचा प्रयत्न करत असले तरी, पटोले यांच्या विधानामुळे नवीन वाद तयार होत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काँग्रेसची तयारी काय आहे अशी विचारणा केली होती. तेव्हा २०१४ सारखी परिस्थिती झाल्यास तयारी असावी म्हणून आणि स्वबळाचे नियोजन करत आहोत, असे उत्तर दिल्याचे पटोले म्हणाले. वेळ आली तर मी स्वतः शरद पवार यांना भेटेन. मात्र आता तशी वेळ आलेली नाही. शरद पवार सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत. ते आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत, असे ते म्हणाले.
राज्यपालांना भेटणारमहागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. याच्या निषेधात काँग्रेस आंदोलन करत आहे. गुरुवारी आम्ही राज्यपालांना भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.