प्रविण मरगळे
मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या(Mahavikas Aghadi) मंत्र्यावर होणारे गंभीर आरोप आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा, त्याचसोबत शिवसेना, राष्ट्रवादीनं सुरू केलेला जनतेसोबत संवाद...या सर्व घडामोडी राज्यात मध्यावधी निवडणुकीची तयारी तर नाही ना...अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात परिवार संवाद यात्रेचं आयोजन केले आहे. तर आता शिवसेनाही शिवसंपर्क अभियान राबवणार आहे.( Shiv Sena will launch Shiv Sampark Abhiyan across the state after NCP Parivar Samvad Yatra)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, चांदा ते बांदा जयंत पाटील विविध जिल्ह्यांमध्ये फिरून राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद साधत आहेत. तर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, या बैठकीत २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवा, असा आदेश नेत्यांना देण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी, शिवसेनेला चांगलं यश मिळालं, त्यामुळे दोन्ही पक्ष आणखी संघटनात्मक बांधणीसाठी संवाद दौरे काढत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही फेरबदल झाल्याचं दिसून येतं, प्रदेशाध्यक्षासह ६ कार्यकारी अध्यक्षांची निवड करून काँग्रेसही तयारीला लागली आहे. त्याचसोबत भाजपाही विविध पातळीवर बैठका घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सध्या सुरु असलेली संघटनात्मक बांधणी आणि राज्यभर संवाद दौरे यातून तिन्ही पक्ष मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहेत का?(Mid Elections in Maharashtra) असा प्रश्न पडतो, काही दिवसांपूर्वी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जास्त काळ विरोधी पक्षात राहायचं नाही असं विधान केले होते, त्या पार्श्वभूमीवर राज्यात घडणाऱ्या या राजकीय घडामोडीकडे पाहायला हवं.
राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता, त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सुरूवातीला या प्रकरणाकडे पक्ष गांभीर्याने पाहत आहे असं म्हटलं होतं, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? अशी चर्चा सुरू झाली होती, त्यानंतर या महिलेवर तत्कालीन भाजपा नेते कृष्ण हेगडे यांनी ब्लॅकमेलिंगचे आरोप लावले होते, कृष्णा हेगडे यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रकरणात भाजपाने(BJP) इतकी आक्रमकता दाखवली नाही तितकी शिवसेना(Shivsena) मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्या प्रकरणात दाखवली आहे. धनंजय मुंडे यांचे प्रकरण ताजे असतानाच महाविकास आघाडी सरकारच्या दुसऱ्या मंत्र्यावर अशाप्रकारे गंभीर आरोप झाल्याने ठाकरे सरकार अडचणीत सापडले.
राज्यात सुरू असणाऱ्या या राजकीय घडामोडींकडे राजकीय विश्लेषक कसं पाहतात हे जाणलं असता, लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान म्हणतात की, भाजपा सोडून मध्यावधी निवडणुका कुठल्याच पक्षाला परवडणाऱ्या नाहीत. कारण सर्वात जास्त पैसे आज भाजपाकडे आहेत. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आणि काँग्रेसने उद्या अचानक पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला तर दोलायमान स्थिती होऊ शकते. अशा वेळी लागलीच पर्यायी सरकार उभे राहिले नाही तर मध्यावधी निवडणुका होतील. परंतु पर्यायी सरकार उभं करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करेल आणि त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता मला कमी वाटते. पण शेवटी राजकारणात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले तेव्हापासून काहीही होऊ शकतं यावर माझा विश्वास बसला आहे असं त्यांनी सांगितले.
तर शिवसेना, राष्ट्रवादी मध्यावधीसाठी तयारी करत आहेत असं वाटत नाही परंतु तीन पक्षांचं एकत्रित सरकार आहे म्हटल्यानंतर आघाडीतील प्रत्येक पक्षाने स्वतःसाठी चा स्पेस मोठा करणे अतिशय आवश्यक आहे राष्ट्रवादीने त्याची सुरुवात केली आहे शिवसेना आता ते करत आहे असं मत वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, भाजपाची जागा तिन्ही पक्षांना घ्यायची आहे, त्यातही शिवसेना, राष्ट्रवादीला काँग्रेसचीही जागा घ्यायची आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी येत्या काळात आणखी आक्रमकपणे लोकांमध्ये जाताना दिसतील, त्यात काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, भाजपाची स्पेस जेवढी कमी करता येईल तितकची करण्याचा प्रयत्न शिवसेना-राष्ट्रवादीकडून केला जात आहे असं वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.