पुणे : संभाजी भिडे यांना अटक करण्याची गरज असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहे असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. पुण्यात महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी.जे.खताळ पाटील यांच्या शतक महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
भीमा कोरेगाव घटनेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी एकबोटेंना एक न्याय आणि भिडे यांना वेगळा न्याय दिला जात असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रकाश आंबेडकर हे तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत त्वरित कारवाई करावी असेही त्यांनी सुचवले. ऍट्रॉसिटी कायद्याच्या धोरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान त्यांनी केले.याबाबत लवकरात लवकर पुनर्रयाचिका दाखल करण्यात यावी अन्यथा आंदोलने होऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. लिंगायत समाजाला कर्नाटक सरकारने दिलेल्या अल्पसंख्यांक दर्जावरही त्यांनी भाष्य केले. या निर्णयाबद्दल कर्नाटक सरकारचे अभिनंदन केले. ही मागणी घेऊन लिंगायत समाजाचे लोक माझ्याकडे आले होते असेही ते म्हणाले.