>> अमेय गोगटे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसली, तरी प्रचारात सगळ्यात जास्त चर्चा त्यांचीच आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात आजवर कधीही न झालेला प्रयोग मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे करत आहेत. स्वतः एकही उमेदवार उभा न करता, ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाडण्यासाठी मैदानात उतरलेत. त्यामुळे मनसेचा 'पाडवा मेळावा' (मोदींना) 'पाडा मेळावा'च ठरला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना एक संधी देऊन बघू या, असं आवाहन करून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा नारळ वाढवला. परंतु, राज ज्यांचा प्रचार करताहेत, त्या पक्षांना त्यांच्यावर 'मनसे' भरवसा आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं एक विधान.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, 'मिस्टर क्लीन' आणि अभ्यासू नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण ओळखले जातात. कराडचे हे 'बाबा' राजकारणात किती मुरलेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणूनच, पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांना राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, राज यांची भूमिका स्वागतार्ह आहे, पण त्याचं मतात कितपत रूपांतर होईल, हे पाहावं लागेल, अशी अत्यंत सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या एका वाक्याचे अनेक अन्वयार्थ निघतात.
राज ठाकरेंचा दौरा असो किंवा सभा; तिथे प्रचंड गर्दी लोटते, हा नेहमीचा अनुभव. सुरुवातीच्या काळात या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर झाल्याचंही महाराष्ट्राने पाहिलंय. विधानसभेत १३ आमदार, मुंबई महानगरपालिकेत २७ नगरसेवक, नाशिक महापालिकेची सत्ता, हा सगळा चमत्कार या गर्दीनेच केला होता. पण, हळूहळू चित्र बदललं. आजही राज ठाकरेंसाठी होणारी गर्दी कायम राहिलीय, पण तिचं मतांमध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण कमी झालंय. ते अचूक हेरूनच, मनसेचा कितपत फायदा होईल, याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी शंका उपस्थित केलीय.
राज ठाकरे यांची खळ्ळ-खटॅक भूमिका काँग्रेसला कधीच पटली नव्हती. परप्रांतियांविरोधात मनसेनं केलेला 'राडा', त्यांना केलेली मारहाण, छट पूजेला विरोध यावरून राज ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बरीच शाब्दिक खडाजंगी झाली होती. संजय निरुपम आणि राज हे एकेकाळचे मित्र या मुद्द्यावरून कट्टर राजकीय शत्रू झाल्याचं सगळ्यांनीच पाहिलंय. एवढं सगळं झालं असताना, मनसेच्या मतदारांचं मन इतकं बदलेल का, असाही एक मुद्दा चर्चिला जातोय. त्यामुळेही कदाचित पृथ्वीबाबा साशंक असतील. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हे खरं आहे. पण ते नेत्यांच्या पातळीवर. कार्यकर्ते बिच्चारे नाईलाजास्तव युतीतील 'भावा'चे किंवा आघाडीतील 'मित्रा'चे झेंडे फडकवत असतात. अर्थात, कुठल्या तरी मतदारसंघात हाच 'भाऊ' किंवा 'मित्र' त्यांच्या उमेदवाराला मदत करणार असतो. पण, राज ठाकरेंच्या समर्थकांना तसंही काही दिसत नाहीए. त्यामुळे 'कोणता झेंडा घेऊ हाती' ऐवजी 'अन्य कुणाचा झेंडा का घेऊ हाती', असाही प्रश्न काही जणांना पडलाय.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचं कौतुक होतंय. व्हिडीओ क्लिप्स दाखवून त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. हे तंत्र सगळ्यांनाच आवडलंय. परंतु, राज ठाकरेंनी हे पहिल्यांदाच केलं का? नाशिकमध्ये केलेल्या कामांचं प्रेझेन्टेशनही त्यांनी भर सभेत दाखवलं होतं. बहुचर्चित ब्लू प्रिंटही सगळ्यांनी स्क्रीनवर पाहिली होती. त्यातही महाराष्ट्राचं 'नवनिर्माण' झाल्याचं सगळ्यांनी पाहिलं होतं. परंतु, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या ट्रॅकवर 'इंजिन' वेगानं धावू शकलं नव्हतं. थोडक्यात, मनसेनं मतदारांच्या मनातील स्थान गमावल्याचंच ते द्योतक होतं. ते पुन्हा उघड व्हायला नको, म्हणूनच राज ठाकरे लोकसभेच्या रिंगणात स्वबळावर उतरले नाहीत, असं म्हणणाराही एक वर्ग आहे. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे सांगतात म्हणून मोदींविरोधात मतदान किती जण करतील, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांना आली तर त्यात त्यांचं काहीच चुकत नाही, नाही का?
जाता जाताः राज ठाकरे समर्थकांना त्यांच्या 'साहेबां'विरोधात काही बोललेलं-लिहिलेलं खरं तर अजिबात आवडत नाही. हा लेखही त्यांना पटणार नाही, रुचणार नाही. पण, त्यांचा भलताच प्रॉब्लेम झालाय. काही बोललं तर ते पृथ्वीराज चव्हाणांना लागेल. कारण, राज यांच्या करिष्म्यावर शंका त्यांनी घेतलीय. पण, 'बाबा' पडले काँग्रेसचे आणि राज ठाकरे काँग्रेसचाच तर प्रचार करताहेत. हे म्हणजे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशीच परिस्थिती झाली. मनसैनिकांना हे खरंच झेपेल?