Prithviraj Chavan Maharashtra Vidhan Sabha 2024: मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना माझा सवाल आहे की, तुम्ही संविधान पूर्णपणे मान्य करून जाहीरपणे मनुस्मृती जाळणार आहात का?, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. मराठा-ओबीसी संघर्षाबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांची लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव आणि लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विशेष मुलाखत घेतली.
लोकसभेतील यश मिळाल्यानंतर काँग्रेसने रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जायला हवं होतं. काँग्रेस दिसली नाही? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता.
उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "लोकांचे प्रश्न अनेक आहेत. विशेषतः कृषी मालांच्या किंमतींचा विषय आहे. प्रश्न अनेक आहेत. लोक आपापल्या पातळीवर मांडताहेत. स्थानिक पातळीवर मांडताहेत. राज्यव्यापी आंदोलन करायला पाहिजे होतं की, नव्हतं, तो प्रश्न आहे. आता सगळेजण जागावाटपाच्या चर्चेत गुंतललेले आहेत."
लोकसभेला असलेले मुद्दे सुटले का? चव्हाणांचा सवाल
याच प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मला वाटतं की, लोकसभेची निवडणूक पाच मुद्द्यांवर लढवली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार आणि संविधान वाचवा, हे पाच मुद्दे होते. कुठला मुद्दा सुटलाय? सगळे मुद्दे अस्तित्वात आहेत. आता ही विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची नाही; मग तुमचा संविधान बदलाचा मुद्दा कुठे आला, अशी मांडणी होतेय."
पंतप्रधान मोदी-मोहन भागवतांना पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
"याला आमचं उत्तर असं आहे की, ही मानसिकता आहे. ही विचारधारा आहे. तुम्हाला जरा दगडाखालचा हात निसटला, जरा तुम्हाला लोकसभेत चांगलं बहुमत मिळालं, तुम्ही हे करणार आहात? तुम्ही (भाजपा) जाहीरपणे मनुस्मृतीचा निषेध करता का? तुम्ही जाहीरपणे मनुस्मृतीचं दहन करता का? माझं भागवतांना, मोदींना सवाल आहे की, तुम्ही सांगता का की, राज्यघटना ही समता, न्याय, बंधुत्वावर आधारित आहे. ही आम्हाला पूर्णपणे मान्य आहे आणि जे काही मनुस्मृतीच्या नावाखाली चाललं होतं, ती चुकीची आहे आणि आम्ही तिचं दहन करतो, असं तुम्ही म्हणणार आहात का?", असे आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाला दिले.
फडणवीसांनी मराठा-ओबीसींमध्ये फूट पाडली -चव्हाण
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने मराठा आणि ओबीसींमध्ये उभी फूट टाकलेली आहे. जी महाराष्ट्रात कधी नव्हती. शाहू महाराजांनी धनगर समाजात घरचा विवाह केला. कारण ते क्षत्रिय आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये फूट टाकली. तु्म्ही दलितांमध्ये बौद्ध दलित आणि हिंदू दलित फूट टाकली. तुम्ही ठिकठिकाणी अशी फूट टाकण्याचा प्रयत्न करताय. जास्तीत जास्त माणसं उभी करून मतं कशी विभाजित होतील, हे करताय. लोकसभेला आम्ही जिंकलो, याचं मोठं कारण होतं की, मोदींच्या विरोधातील मतांची विभागणी झाली नाही", असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.