- शीलेश शर्मा नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा अखेर सक्रिय राजकारणात उतरल्या असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लगेचच त्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे. मोदी सरकारला लोकसभा निवडणुकांत रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी काढलेले हे ब्रह्मास्त्र असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे काँग्रेसचे नेते, तळागाळातील कार्यकर्तेही प्रचंड आनंदात असून, भाजपाने अपेक्षेप्रमाणेच नेहरू-गांधी घराणेशाहीचे हे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका केली आहे.यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी हल्ली आजारी असतात. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रियंका यांची मोठी मदत होईल. प्रियंका कदाचित अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवतील. त्यामुळे राहुल अमेठीऐवजी रायबरेलीमधून निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे. प्रियंका यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय या आधीच घेतला होता आणि त्यामुळे त्या अलीकडे काँग्रेसच्या अनेक बैठकांनाही हजर राहत होत्या.स्वत: राहुल गांधी यांची प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाचा काँग्रेसला फायदा होईल, असे म्हटले आहे. मात्र सपा-बसपा यांना धक्का देण्यासाठी हा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मायावती व अखिलेश यादव यांच्याविषयी आपल्या मतान अतीव आदर असून, त्यांच्या आघाडीला त्रास देणे हा काँग्रेसचा अजिबात विचार नाही, आमची लढाई भाजपाशीच आहे आणि भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसही या दोन पक्षांसोबत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी अमेठी मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.भाजपाच्या व्होट बँकेला धक्का देणे, हाच प्रियंका गांधी यांच्या राजकारणात उतरण्याचा मूळ हेतू आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसल्यास केंद्रातील सत्ता मिळवणे भाजपाला अशक्य होईल, या विचारातूनच राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. विरोधकांच्या मदतीने काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास कदाचित प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदही सोपविले जाईल, असे काँग्रेसमध्ये बोलले जात आहे. मात्र या चर्चेला कोणताही आधार नाही.राहुल गांधी यांनी पक्षसंघटनेत केलेल्या काही बदलानुसार तरुण नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची जबाबदारी सोपविताना त्यांनाही सरचिटणीस केले आहे. उत्तर प्रदेशसाठी प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य सिंदिया असे दोन सरचिटणीस असल्याने गुलाम नबी आझाद यांच्याकडे आता हरयाणाची सूत्रे देण्यात आली आहेत. अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांना सरचिटणीसपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. ती जबाबदारी आता के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे देण्यात आली आहे.>सपा-बसपा चक्रावलेप्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविल्याने सपा-बसपा हे दोन्ही पक्षही काहीसे चक्रावले आहेत. भाजपाबरोबरच आपल्यालाही धक्का बसेल, असे सपा-बसपाला वाटत आहे.अर्थात सपा-बसपा आघाडीने काँग्रेसला जाणीवपूर्वक दूर ठेवल्यानंतर उत्तर प्रदेशात स्वबळासाठी काही उपाय योजणे काँग्रेसला आवश्यकच होते, असे सपाच्या एका नेत्याने सांगितले.>मोदी-योगींचा गडजिंकण्याची जबाबदारीप्रियंका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविल्याने भाजपाला मोठे धक्के देता येतील, असा काँग्रेसचा होरा आहे.उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ येतो आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजकीय ताकदही उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच आहे. त्यामुळे त्या दोघांची डोकेदुखी वाढेल, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.>लोकसभेचे गणित असेयूपीत लोकसभेच्या ८0 जागा आहेत. ५0 जागांची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपविण्याची मोठी खेळी राहुल गांधी खेळले आहेत.>या मतांवर प्रभाव पडेलउत्तर प्रदेशात ब्राह्मण मतदार१५ टक्के व मुस्लीम मते २३ टक्के असून, त्यांच्यावर प्रियंका प्रभाव पाडू शकतील, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.>आजीची साडी नेसून घेणार पहिली सभा?अधिकृत जबाबदारी मिळाल्यानंतर, प्रियंका गांधी पहिली सभा आजी इंदिरा गांधी यांची साडी नेसून घेणार आहेत, असे कळते.
प्रियंका गांधी राजकीय मैदानात, लोकसभा जिंकण्यासाठी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 6:28 AM