...तर मी त्यांची क्षमा मागतो, शिस्तभंगाला घटनेप्रमाणे शिक्षेची तरतूद - मुकुल वासनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:33 AM2020-08-26T02:33:21+5:302020-08-26T06:47:38+5:30
सोमवारी कॉँग्रेस कार्यसमितीची बैठक सात तास चालली. तत्पूर्वी, कॉँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते.
विकास झाडे
नवी दिल्ली : येत्या काळात पक्षापुढे खूप मोठे आव्हान आहे. ते लीलया पेलत २०२४ च्या निवडणुकीचे ‘लक्ष्य’ ठेवणे आणि पक्ष मजबूत करणे यासाठीच आम्ही अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आम्ही उपस्थित केलेले मुद्दे आणि दिलेले पत्र यामुळे शिस्तभंग होत असेल तर पक्षाच्या घटनेप्रमाणे सदस्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे. आम्हाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी ती भोगण्यास आम्ही तयार आहोत, अशी भावना कॉँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
सोमवारी कॉँग्रेस कार्यसमितीची बैठक सात तास चालली. तत्पूर्वी, कॉँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. बैठकीत या विषयावर दीर्घ चर्चा झाली. ज्यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यांनी बैठकीत मात्र तोंडावर बोट ठेवले होते. अहमद पटेल यांच्या रडारवर गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक आले. पटेल यांनी या तिन्ही नेत्यांच्या कृतीबाबत दु:ख व्यक्त केले होते. त्यावर लगेच मुकुल वासनिक यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, अहमद भाईंना आमच्या कृतीमुळे दु:ख झाले असेल तर मी त्यांची क्षमा मागतो.