चैत्र सुरू झालाय. चैत्राच्या तिसऱ्या दिवसापासून अक्षयतृतीयेपर्यंत चैत्रगौर उत्सव सुरू होतो. हा खरं तर माहेरवाशिणींचा कौतुक सोहळा असतो. या काळात मंगळवारी, शुक्रवारी गौरीपूजनानंतर हळदी-कुंकू सोहळा आयोजित केला जातो. सध्या दोन माहेरवाशिणी बारामती मतदारसंघ गाजवत आहेत. प्रचार करताना बारामतीच्या आत्याबाई दौऱ्यावर आलेल्या दौंडच्या सासुरवाशीण भाचीला चैत्रगौरीच्या हळदी-कुंकू सोहळ्यात एका कार्यकर्तीच्या घरी भेटल्या. हा सुगावा लागल्यानं आम्ही तिथं पोहोचलो. त्या वेळचा संवाद खास आमच्या चाणाक्ष वाचकांसाठी... अशा बातम्या तुम्हाला आमच्याकडेच वाचायला मिळतील.(दोघीही हा हळदी-कुंकू सोहळा मोठ्या प्रेमानं करतात आणि बोलू लागतात...) बारामतीच्या ताई : घाम किती आलाय तुला. दमलीस काय इतक्यात? बराच पल्ला गाठायचाय. तुम्ही नव्या पोरी लवकर दमता. हे घे पन्हं. कूल वाटेल लगेच. दौंडच्या ताई : दमायला काय झालंय आत्याबाई? अहो, बाहेर वातावरण किती तापलंय पहा. त्यामुळं घाम आलाय. पण कसं ‘कुल’ व्हायचं हे समजतं आम्हाला.
बारामतीच्या ताई : हो ग हो. खूपच तापलंय वातावरण. पण मला सवय आहे. मी फिरतच असते. गेली दहा वर्षे हा मतदारसंघ पालथा घातलाय मी. तू नवीन आहेस अजून.दौंडच्या ताई : हो तुमचे ‘सेल्फी’ पाहायचे मी. खड्ड्यांसोबतचे तुमचे ‘सेल्फी’ मला फार आवडले आत्याबाई. त्यानिमित्ताने या मतदारसंघातील न सुटलेल्या बºयाच समस्या समजल्या.
बारामतीच्या ताई (विषय बदलतात) : एवढ्या गडबडीत तू आलीस, हा मणि‘कांचन’ योगच म्हणायचा. शेवटी तू आमचीच. बारामतीचीच. भल्या-भल्यांच्या तोंडचं पाणी पळवतो आपण. दौंडच्या ताई (उसळून) : आपण नाही; तुम्ही पाणी पळवता. आम्ही दौंडवाले तुमच्याकडे पाणी पाठवतो. बाकी नातं आपल्या ठिकाणी आहेच. पण राजकारणात आपलं जमायचं नाही.बारामतीच्या ताई : एवढं एक्साईट व्हायचं नाही बाई. अग, आमच्याकडून काही शिकलीस की नाही? सासरचे काय म्हणतील? कारण काही असलं तरी चिडायचं नाही. मला बघ, तुझ्या आजोबांना बघ. माझे ‘सेल्फी’ पाहिलेस; कामांचीही माहिती घे. शेवटी काम बोलतं बघ.
दौंडच्या ताई : माफ करा आत्याबाई. लहान तोंडी मोठा घास. पण आपल्याकडे बरीच कामं अजून व्हायचीत. ठराविक भागाचाच विकास झालाय. बारामतीच्या ताई : खिरापत घे खिरापत. (कार्यकर्तीकडून चैत्रगौरीची वाटलेली डाळ, बत्तासे, खिरापत देतात) ही घे खिरापत. असा खिरापतीप्रमाणे या भागात विकासकामांसाठी पैसा वाटलाय मी.सर्वदूर विकास केलाय मी. नुसते आश्वासनांचे बत्तासे नाही वाटले.
दौंडच्या ताई : मग ‘त्या’ चाळीस गावांच्या गावकºयांना पाण्याविना डोळ्यांतून पाणी गाळावं लागलं नसतं. मागच्या वेळी आमच्या नेत्यांनीच इथल्या लढाईत ‘जान’ आणली होती. पण ‘कपबशी’नं घोळ केला. आमचे सगळे नेते म्हणतच आहेत, की इतिहास घडवण्याची यंदा संधी मलाच आहे.बारामतीच्या ताई : (छद्मीपणे) भले भले थकलेत. तूच राजकारणातून ‘इतिहासजमा’ नको व्हायला. बघ हं. काळजी घे. (दोघींना पाहून तिथं जमलेल्या बायका म्हणू लागल्या...)
गौराई आल्या... गौराई आल्या... कोणत्या पावलानं...हळदी-कुंकवाच्या, हिऱ्या -माणकाच्या...
...रुणझुणत्या पाखरा, जा माझ्या माहेरा...आल्या गौराई अंगणी त्यांना लिंबलोण करा.....................